नगर – झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटक म्हणजे महाराष्ट्रातील सर्व कलांचा सुरेख संगम आहे. कारण रसिकांची दाद मिळाल्यावरच कलाकार मोठा होत असतो, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री तथा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त सावेडीतील माऊली सभागृहात आयोजित झाडीपट्टी रंगभूमीवरील ‘गद्दार’ या नाटकातिल कलावंतांच्या सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या. नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले, उपनगर शाखेचे अध्यक्ष क्षीतिज झावरे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर आदी यावेळी उपस्थित होते. शिर्के म्हणाल्या की, शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर विविध कलांचे अदान प्रदान व्हावे, झाडीपट्टी रंगभूमीवरील कला महाराष्ट्रातील इतर रसिक प्रेक्षकांनाही पाहता यावी त्यासाठी नाट्य परिषदेने पुढाकार घेऊन या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर आयोजित केले आहेत. या सर्व प्रयोगांना महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या नाट्यप्रयोगास ज्येष्ठ रंगकर्मी प्राध्यापक मधुसूदन मुळे, नाट्य लेखक दिग्दर्शक डॉ. सोमनाथ मुटकुळे, पी. डी. कुलकर्णी, अविनाश कराळे, रियाज पठाण, भगवान राऊत यांच्यासह नाट्य क्षेत्रातील अनेक कलावंत व तंत्रज्ञ रसिक प्रेक्षक उपस्थित होते. अमोल खोले यांनी प्रास्ताविक केले. सतीश लोटके यांनी सूत्रसंचालन केले. क्षीतिज झावरे यांनी आभार मानले. आनंद धिमटे लिखित व नरेश गडेकर दिग्दर्शित, नित्यानंद बुद्धे पाटील निर्मित गद्दार या नाटकामध्ये नरेश गडेकर, देवेंद्र लुटे, आसावरी तिडके, अरविंद झाडे, देवेंद्र दोडके, शुभम मसरान, निशांत अजबेले, चैतन्य दुबे, करिष्मा मेश्राम, सुनन्या खोब्रागडे, अमोल देऊलवार, पौर्णिमा तायडे, गंधर्व गडेकर यांनी विविध भूमिका साकारल्या. प्रमोद ढोंगे यांचे नेपथ्य, नरेश भोयर यांची प्रकाशयोजना, राकेश राऊत यांचे संगीत लाभले. तबल्यावर ज्ञानेश्वर बोंगरवार तर ऑक्टोपॅड वर राधेश्याम डोलारकर यांनी संगीत साथ दिली.