Eetha Trailer : श्रद्धाचा नऊवारीतील लूक पाहून चाहते घायाळ! ईठाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Eetha Trailer : ट्रेलरमध्ये तिचा पारंपरिक लूक, अभिनय आणि दमदार संवाद लक्ष वेधून घेत आहेत.

Eetha Trailer : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच ‘ईठा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मॅडॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन्स निर्मित या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
महाराष्ट्राच्या लोककलेचा अनमोल ठेवा जपणाऱ्या प्रसिद्ध तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये तिचा पारंपरिक लूक, अभिनय आणि दमदार संवाद लक्ष वेधून घेत आहेत.
विठाबाईंच्या भूमिकेत श्रद्धाचा नवा अवतार!
‘ईठा’च्या ट्रेलरमध्ये महाराष्ट्रातील तमाशा आणि लावणीच्या रंगतदार विश्वाची झलक पाहायला मिळते. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व अशा रूपात श्रद्धा कपूर दिसत आहे. विठाबाईंचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि कलेप्रती असलेली निष्ठा चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
ट्रेलरमधील ‘हे फक्त एक वस्त्र नाही, हा अभिमान आहे,’ हा श्रद्धाचा संवाद विशेष लक्षवेधी ठरत आहे. नऊवारी साडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि स्त्रीचा आत्मसन्मान अधोरेखित करण्यात आला आहे.
रणदीप हुडाही महत्त्वपूर्ण भूमिकेत
या चित्रपटात अभिनेता रणदीप हुडा विठाबाई नारायणगावकर यांचे पती ‘मर्चंट’ यांची भूमिका साकारत आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूकही शेअर केला होता. त्यामुळे श्रद्धा आणि रणदीप यांची ऑनस्क्रीन जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अजय-अतुल यांच्या संगीताची जादू
महाराष्ट्राच्या लोककलेचा आणि लावणीच्या परंपरेचा अनुभव मोठ्या पडद्यावर देण्यासाठी चित्रपटात विशेष मेहनत घेण्यात आली आहे. अजय-अतुल यांनी चित्रपटाला संगीत दिले असून, वैभवी मर्चंट यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. श्रद्धा कपूर आणि रणदीप हुडा यांच्यासोबत मोहम्मद झीशान अय्युब, अनंत जोशी, सिद्धार्थ जाधव, अक्षरा सिंग आणि उल्का गुप्ता हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
४ डिसेंबरला चित्रपटगृहांत येणार ‘ईठा’
‘ईठा’ हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राच्या तमाशा संस्कृतीचा गौरव करणारी विठाबाईंची संघर्षमय कहाणी श्रद्धा कपूर कशा प्रकारे पडद्यावर साकारते, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.





