पुणे (प्रतिनिधी): लोहगाव परिसरात कौटुंबिक वादातून एकाने पत्नीचा खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशीला इमिल किंडो (वय २१, मूळ रा.जनकी टोली, कोखेडगा, झारखंड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती संदीप भूषण लकडा (वय २१, रा. अनिरुद्ध खेसे यांची वीटभट्टी, लोहगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गिरी यांनी या संदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीला आणि संदीप दोघेजण मजुरी करतात. शुक्रवारी सकाळी अनिरुद्ध खेसे यांच्या वीटभट्टीच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीत एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त रामचंद्र देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.