खावी लागेल जेलची हवा : “टेस्ट व्होट’चीही मिळणार संधी
पुणे – लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा ईव्हीएमसोबत “व्हीव्हीपॅट’ (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) मशीन जोडले जाणार आहे. यामुळे ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या “व्हीव्हीपॅट’च्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत सात सेंकद दिसणार आहे. जर एखाद्या मतदाराने “मतदान केलेल्या पक्षाचे चिन्ह व्हीव्हीपॅट मशीनवर दिसले नाही, दुसऱ्याच उमेदवाराचे अथवा पक्षाचे चिन्ह त्याच्यावर दिसले’ अशी तक्रार केल्यास आणि ती तक्रार खोटी ठरल्यास संबंधित मतदाराला जेलची हवा खावी लागणार आहे. याप्रकरणी संबंधित मतदाराला सहा महिन्यांची कैद अथवा एक हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.
निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी आयोगाने पावले उचलेली आहेत. ईव्हीएमच्या वापराबरोबरच आता “व्हीव्हीपॅट’ जोडण्यात येणार आहे. या सुविधेमुळे मतदाराला आपण नोंदवलेले मत प्रत्यक्ष त्याच उमेदवाराला मिळाल्याची खात्री पटणार आहे.
जर एखाद्या मतदाराने मतदानकरतेवेळी या “व्हीव्हीपॅट’वर आक्षेप नोंदविला आणि ज्या उमेदवारला मत दिले त्या उमेदवाराचे चिन्ह “व्हीव्हीपॅट’वर न दिसता दुसऱ्याच उमेदवाराचे चिन्ह दिसले अशी तक्रार केली, तर त्या तक्रारीची दखल संबंधित मतदान केंद्रस्तरीत अधिकारी घेणार आहे. संबंधित मतदाराला खरंच असा प्रकार घडला आहे का, याची विचारणा अधिकारी करणार आहे. जर मतदार त्या तक्रारीवर ठाम असेल, तर त्या मतदाराकडून एक अर्ज भरून घेतला जाणार आहे. “जर मतदार खोटे बोलत असेल तर सहा महिने शिक्षा अथवा एक हजार रुपये दंड होऊ शकतो,’ या नियमाची माहिती या अर्जामध्ये असणार आहे. त्यानंतर त्या मतदाराला पुन्हा “टेस्ट व्होट’ची संधी दिली जाणार आहे. यावेळी त्या मतदारासोबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान केंद्रावरील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि साक्षीदार उपस्थित राहणार आहे. जर “टेस्ट व्होट’मध्ये मतदार खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाल्यास त्या मतदाराला जागेवरच पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. राजकीय पक्षांकडून याविषयी विविध आरोप करण्यात आले होते. मशीनमध्ये सेटिंग केलेली आहे. त्यामुळे हा उमेदवार विजय झाला. कोणत्याही उमेदवारासमोरचे बटन दाबले तरी ठराविक पक्षाच्या उमेदवाराला मत मिळते, असे अनेक आरोप करण्यात आले होते. काही जणांनी याविषयीच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल केल्या होत्या. तर काही जणांनी याविषयी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदाराने कोणाला मतदान केले याची माहिती मतदाराला मिळण्यासाठी व्हीव्हीपॅट या मशीनवर दिलेले मत प्रिंट स्वरुपात दिसण्याची व्यवस्था केलेली आहे. यामुळे मतदाराच्या आणि उमेदवारांच्या मनात कोणतीही शंका राहणार नसल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.