सोयाबीनचे घसरलेले भाव महायुतीला आणणार अडचणीत; शेतकऱ्यांच्या नाराजीचा मतदानात बसणार फटका

छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा निवडणूकीतही पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यासह देशात सध्या कांद्याचे दर वाढल्याने कांदा सत्ताधा–यांना रडविणार असल्याचे दिसून येत आहे. तसेच सोयाबीनचे पडलेले भावही सत्ताधा-यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात कांद्याने रडवले तर विदर्भ आणि मराठवाड्यात सोयाबीन सत्ताधा-यांना कोंडीत पकडू शकते. खास करून मराठवाडा आणि विदर्भात याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला कांद्याने रडविले होते. कांद्याचे भाव कोसळल्याने संतापलेल्या शेतक-यांनी सहा लोकसभा मतदारसंघांत विरोधात कौल दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सोयाबीनचे भाव कोसळले. तीन वर्षांपूर्वी सहा हजारांच्या घरात विकले जाणारे सोयाबीन आता तीन हजार रुपये क्विंटलने विकले जाते.
राज्यात मराठवाडा, विदर्भात सोयाबीन ३० लाख हेक्टरवर पिकवले जाते. सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या संतापाचा सामना जवळपास ६० ते ७० मतदारसंघांत करावा लागण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात लातूर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, संभाजीनगरमधील जवळपास सर्वच मतदारसंघांत फटका बसू शकतो.
विदर्भात यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांतील मतदारसंघांत सत्ताधा-यांना फटका बसू शकतो. सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निवडणुकांच्या काळात सत्ताधा-यांना ही नाराजी परवडणारी नाही. सोयाबीनच्या दरावरून शेतक-यांमध्ये नाराजी असतानाही सत्ताधारी मात्र आम्हाला फटका बसणार नाही असे म्हणत आहेत.
कांद्याबाबत सरकारने जशी दक्षता घेतली तशी सोयाबीनच्या भावाबाबत सरकारने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत का असा सवाल उपस्थित होत आहे. जर सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी आपला संताप मतपेटीतून व्यक्त केला तर महायुतीचे अवघड होऊन बसणार आहे.





