Cotton Price: कापसाच्या दरात घसरण; केवळ ‘इतका’च मिळतोय भाव

धुळे – जिल्ह्यात यंदा अडीच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. मात्र, कापसाला फक्त सात हजार रुपये क्विंटल इतकाच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला आहे, मात्र अद्यापही कापूस घरातच पडून असल्याने सण साजरा करायचा तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात तब्बल अडीच लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती, मात्र जिल्ह्यात अत्यल्प झालेला पाऊस आणि वातावरणातील बदलाचा कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
कपाशीचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर वेचणी करण्यात आली असून यंदा कपाशीला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र दुसरीकडे फक्त सात हजार रुपये क्विंटल इतकाच भाव सध्या कपाशीला मिळत असून, उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
“लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव
जिल्ह्यातील बहुतांश भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी कापूस विकण्याऐवजी घरात साठवणूक केला आहे. त्यातच पुन्हा दरात घसरण झाली आहे. दर सध्या सात हजार रुपयांवर आले आहेत. कापसाच्या दरात सातत्याने घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस केंद्राकडे पाठ फिरविली आहे. एकीकडे दिवाळी तोंडावर आली असताना अचानक दर कोसळल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी पसरली आहे.



