पुणे जिल्हा | आत्महत्येचा बनाव पतीच्या अंगलट ; परप्रांतीय महिलेचा खून

यवत, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील यवत येथील भवानीनगर येथे एका परप्रांतीय अल्पवयीन पतीने २६ वर्षीय पत्नीचा रागाच्या भरात गळा आवळून खून केला. ही घटना बुधवार (दि.९) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. पतीने ओढणीच्या साहाय्याने पत्नीला घरातील पंख्याला मृतदेह लटकवून पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.
मात्र, हा बनाव त्याच्या अंगलट आला. मणिका प्रसंथा जेना (वय २६, सध्या रा. भवानीनगर, यवत, ता. दौंड, मूळ रा. ओरिसा), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती मोहमद रेहान मुस्ताक (वय १९, रा. पचोर, उत्तरप्रदेश) यास पोलिसांनी अटक केली.
भवानीनगर यवत येथील सारिका गायकवाड यांच्या पत्र्याच्या खोलीत हे परप्रांतीय दाम्पत्य राहत होते. ते यवत येथील एका परप्रांतीय ठेकेदाराकडे कामाला होते. रात्री जेवण झाल्यानंतर दोघांच्यात भांडण झाले. भांडणात पतीने तिचा गळा दाबून खून केला. तिने गळफास घेतल्याचा बनाव भासविण्यासाठी मृतदेह ओढणीच्या साहाय्याने पंख्याला लटकवले.
स्वतः पोलीस ठाण्यात येऊन पत्नीने आत्महत्या केल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. पत्नीचा मृतदेह यवत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदणासाठी आणण्यात आला. मात्र ही आत्महत्या की हत्या यामुळे शवविच्छेदणासाठी हा मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविला होता.पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यास ताब्यात घेतले.
पोलीस हवालदार प्रकाश झेंडे यांनी यवत पोलिसांत फिर्याद दिली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला दौंड न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे यांनी दिली आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब घोलप व यवत पोलिसांनी ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सपांगे, पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे करीत आहेत.





