Cyber Fraud : निर्मला सीतारमण यांच्या बनावट व्हिडीओचा वापर करून 1.41 कोटींचा गंडा
Cyber Fraud : निर्मला सीतारमण यांच्या बनावट फेसबुक व्हिडीओद्वारे केरळमधील 63 वर्षीय व्यक्तीची 1.41 कोटी रुपयांची फसवणूक. 30 व्यवहार, पोलिसांत गुन्हा दाखल.

Cyber Fraud : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावाचा आणि बनावट व्हिडीओचा वापर करून केरळमधील एका 63 वर्षीय व्यक्तीची 1 कोटी 41 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फेसबुकवर ऑनलाइन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देणारा व्हिडीओ पाहून संबंधित व्यक्तीने त्यातील लिंकवर क्लिक केले. त्यानंतर ठगांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवले. या प्रकरणी कोझिकोड ग्रामीण सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
30 व्यवहारांतून 1.41 कोटी रुपये पाठवले –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुरहीमान पी. हे नाडुवन्नूरमधील नोचाड येथील रहिवासी आहेत. त्यांनी फेसबुकवर निर्मला सीतारमण ऑनलाइन ट्रेडिंगमधून आकर्षक परतावा मिळवून देत असल्याचा बनावट व्हिडीओ पाहिला. तो खरा असल्याचे समजून त्यांनी व्हिडीओसोबत दिलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर ठगांच्या सूचनेनुसार 6 जून 2025 ते 4 नोव्हेंबर 2026 या काळात त्यांनी स्वतःच्या दोन बँक खात्यांतून 30 वेळा पैसे पाठवले. मात्र, त्यांना ना नफ्याची रक्कम मिळाली, ना गुंतवलेले पैसे परत मिळाले.
पैसे परत मिळतील या आशेने तक्रारीला उशीर –
गुंतवलेले पैसे परत मिळतील, या अपेक्षेने अब्दुरहीमान यांनी सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. मात्र, पैसे परत न मिळाल्याने त्यांनी 14 नोव्हेंबर रोजी कोझिकोड ग्रामीण सायबर क्राइम पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318(4) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66D अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची अद्याप ओळख पटलेली नाही. पैसे जमा झालेली बँक खाती आणि फोन कॉलच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे.
ऑनलाइन गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?
– मंत्री, सरकारी अधिकारी किंवा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने आलेल्या गुंतवणुकीच्या जाहिरातींवर लगेच विश्वास ठेवू नका.
– मोठा आणि निश्चित परतावा देण्याचे आश्वासन मिळाल्यास सावध राहा.
– सोशल मीडियावरील अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
– कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून बँक खात्यात पैसे पाठवू नका.
– सायबर फसवणूक झाल्यास तातडीने 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल वर तक्रार करा.





