प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – येथील पाटीलवस्ती परिसरात बनावट गुटखा बनवणा-या कारखान्यावर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकून पुणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 4 जणांना अटक करून सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या बनावट गुटखा तयार करणार्या कारखान्याचा मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय. 25, रा. पत्रावस्ती, थेऊर) व त्याचे कामगार रामप्रसाद ऊर्फ बापू बसंता प्रजापती (वय 50, रा. थेऊर; मूळ गाव उत्तरप्रदेश), अप्पु सुशिल सोनकर (वय 46, रा. थेऊर फाटा; मूळ गाव उत्तर प्रदेश) व दानिश मुसाकीन खान (वय 18, रा. थेऊर फाटा; मूळ गाव उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ंमली पदार्थ विरोधी पथक 2 चे पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांचे सहकारी हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पथकाला थेऊर फाट्याच्या जवळ असलेल्या पाटील वस्ती परिसरात बनावट गुटख्याचा कारखाना आहे अशी माहिती एका खबर्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.या छाप्यात पोलिसांनी गुटख्याची सुंगधित तुंबाखू व पान मसाला तसेच गोदामाच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये बनावट गुटखा तयार करण्याठी लागणारा कच्चामाल आढळून आला. तेथे बनावट सुपारी, सुंगधीत तंबाखू, ठंडक, केमिकल, गुलाबपाणी, प्रिन्टेड पाऊच, बॉक्स व पोती आढळून आली. तसेच बनावट गुटखा वाहतुक करण्यात करीता मॉडिफाय करण्यात आलेल्या दोन इनोव्हा कार व नॅक्सोन गाडी व 1 लाख 30 हजार रुपयांची रोकड असा एकूण सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारखान्याचा मालक रोहित गुप्ता व त्याच्या तीन कामगारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.