Narhari Zirwal : राज्यात पाकमधून बनावट सौंदर्य प्रसाधने आली; मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली माहिती

मुंबई : पाकिस्तानातील लाहोरमधील घोरी केमिकल आस्थापनांकडून महाराष्ट्रात बनावट सौंदर्य प्रसाधने आल्याची माहिती राज्याचे अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज विधानसभेत दिली. आमदार भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यात बनावट सौंदर्य प्रसाधने करणारे कारखाने चालू असल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना नरहरी झिरवळ म्हणाले, या प्रकरणाच्या अन्वेषणात पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथील काही विक्रेत्यांकडे ही बनावट सौंदर्य प्रसाधने आढळली आहेत. या बनावट सौंदर्य प्रसाधनांचा साठा नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बनावट सौंदर्य प्रसाधने आढळल्यास विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा कायदा नाही. वर्ष २०१८ मध्ये याविषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आला होता; मात्र तो संमत झाला नाही. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव संमत केला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी या विक्रेत्यांवर गुन्हा नोंदवला जाईल. पुणे जिल्ह्यात अन्य ठिकाणीही कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांतून आलेली बनावट सौंदर्य प्रसाधने आढळली आहेत. याविषयी संबंधित राज्यांना माहिती कळवण्यात आल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणी पथकामध्ये २०० पदे संमत आहेत. परंतु त्यातील केवळ ४७ पदे भरलेली असून १५३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमधील १०९ पदे भरण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. टाटा कम्युनिकेशन लिमिटेडद्वारे याविषयीची परिक्षा घेण्यात आली आहे. या नियुक्त्या अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी नमूद केले.





