प्रभात वृत्तसेवा पुणे – बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केलेल्या प्राथमिक शिक्षकांवर जिल्हा परिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरतपासणी केली असता तब्बल ४६ शिक्षक हे ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व असलेले म्हणजेच अपात्र असल्याचे समोर आले आहे. या शिक्षकांवर प्रशासनने शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. एवढेच नव्हे, तर या शिक्षकांची यादीच शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील काही प्राथमिक शिक्षक बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे दाखवून बदली, नोकरीतील इतर लाभ व शासनाच्या विविध सवलती घेत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. याची गंभीर दखल घेत प्रमाणपत्रांची फेरतपासणीचा निर्णय घेतला.पहिल्या टप्प्यात १७६ शिक्षकांची प्रमाणपत्रे फेरतपासणीसाठी आरोग्य सेवा उपसंचालकाकडे पाठविली होती. त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यानुसार १३० शिक्षकांची प्रमाणपत्रे वैध ठरली आहेत. उर्वरित ४६ शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण हे ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने ते दिव्यांग सवलतींसाठी अपात्र ठरले आहेत.उर्वरित शिक्षकांचीप्रमाणपत्रे अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविली आहे. त्याचा अहवाल आल्यावर अपात्र शिक्षकांची संख्या वाढू शकते. “अपात्र ४६ प्राथमिक शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. त्यात नोकरी, बदली अथवा विविध शासकीय सवलती अथवा लाभ यातील कोणत्या कारणांसाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेतला, त्यानुसार कारवाई होईल. काहींची विभागीय चौकशी, तर काहींची खात्यांतर्गत चौकशी करुन कारवाई होईल.” -गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद, पुणे