अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना “कौशल्य सेतू’चा आधार!

नगर –  इयत्ता दहावी व बारावी परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यास समोरच्या भविष्याच्या वाटचालीत राहण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी व विद्यार्थ्यांना रोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्यासाठी दहावी व बारावीउत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांकरिता कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली, त्यामुळे दहावी बारावी नापास विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्राप्त माहितीनुसार इयत्ता दहावी व बारावी अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करण्याची योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येईल.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष 2018 – 19 पासून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये उत्तीर्ण न होऊ शकलेले विद्यार्थी या योजनेचे लाभार्थी असतील. ही योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत राबविली जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्यावतीने 4 डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.