Pune District : भीमाशंकरच्या साक्षीने फडणवीस-वळसे-काळे एकत्र; खेडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा
Pune District : माजी आमदार मोहिते पाटील यांनी स्व. आमदार नारायण पवार यांच्या संघर्षाची आठवण करून देत, भीमाशंकरच्या अस्मितेसाठी खेड तालुक्याने अनेक वर्षे लढा दिल्याचे सांगितले होते.

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. मात्र, या दौर्यात विकासकामांपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस, माजी मंत्री तथा आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांचा एकत्र आलेला फोटोच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
भीमाशंकर मंदिर परिसरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलीप वळसे पाटील आणि आमदार बाबाजी काळे यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारत छायाचित्र काढले. विशेष म्हणजे, दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर हात ठेवून उभे असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांचे हे छायाचित्र पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने अनेक अर्थांनी पाहिले जात आहे. या एका फोटोमुळे खेड-आंबेगाव मतदारसंघातील राजकीय चर्चांना नव्याने उधाण आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या ओळखीवरून खेड आणि आंबेगाव तालुक्यात राजकीय वातावरण तापले होते. शिखर समितीच्या बैठकीत भीमाशंकर खेड-आंबेगाव असा उल्लेख झाल्याची माहिती समोर आल्यानंतर माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला होता. पत्रकार परिषदांमधून त्यांनी प्रशासनासह काही राजकीय नेत्यांवर टीका करत, भीमाशंकर हे खेड तालुक्याचेच आहे आणि कायम राहील, अशी ठाम भूमिका घेतली होती.
माजी आमदार मोहिते पाटील यांनी स्व. आमदार नारायण पवार यांच्या संघर्षाची आठवण करून देत, भीमाशंकरच्या अस्मितेसाठी खेड तालुक्याने अनेक वर्षे लढा दिल्याचे सांगितले होते. आम्हाला भीमाशंकरसोबत आंबेगावचे शेपूट जोडायचे नाही, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी मांडली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत वळसे पाटील आणि बाबाजी काळे एकत्र दिसल्याने या छायाचित्राला राजकीय अर्थ प्राप्त झाला आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर भौगोलिकदृष्ट्या खेड तालुक्यात असले तरी विकासकामांचा मोठा भाग आंबेगाव तालुक्याच्या बाजूने होत असल्याचा आरोप खेड तालुक्यातील काही राजकीय गटांकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे भीमाशंकरच्या विकासाच्या प्रश्नावर स्थानिक पातळीवर राजकीय संघर्ष उभा राहिला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासकामांची पाहणी करताना दोन्ही तालुक्यांतील लोकप्रतिनिधींना सोबत घेतल्याने राज्य सरकार विकासाच्या मुद्द्यावर समन्वयाची भूमिका घेत असल्याचे संकेत मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
एकूणच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौर्याने विकासकामांचा आढावा घेतला असला तरी त्यांच्या उपस्थितीत दिलीप वळसे पाटील आणि बाबाजी काळे यांचे झालेले एकत्र दर्शन सध्या पुणे जिल्ह्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. आगामी काळात या एका फोटोचे राजकीय परिणाम किती दूरवर जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाबाजी काळेंच्या ‘मोठ्या शक्ती’ची चर्चा
आमदार बाबाजी काळे हे आपल्या भाषणांमध्ये माझ्या मागे एक मोठी शक्ती आहे, असे वारंवार सांगत असतात. भीमाशंकर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत त्यांची झालेली भेट आणि त्यातून समोर आलेले छायाचित्र पाहता, राजकीय वर्तुळात काळेंच्या मागची ती शक्ती आज प्रत्यक्ष दिसली, अशा चर्चांनाही उधाण आले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील सुसंवादाची झलक या भेटीत दिसून आली. त्यातच बाबाजी काळे यांची उपस्थिती असल्याने खेड-आळंदी मतदारसंघातील आगामी राजकीय घडामोडींवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
मोहिते पाटील यांना राजकीय संदेश?
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा फोटो केवळ औपचारिक भेटीचा नसून त्यामागे राजकीय संदेशही दडलेला असू शकतो. भीमाशंकरच्या प्रश्नावर अलीकडेच आक्रमक भूमिका घेणारे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस, दिलीप वळसे पाटील व बाबाजी काळे यांचे एकत्रित दर्शन यामुळे खेड तालुक्यातील सत्तासमीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अनेक राजकीय निरीक्षक या फोटोला सुखद धक्का तर काही जण आगामी राजकीय संकेत म्हणून पाहत आहेत. विशेषतः खेड आणि आंबेगाव या दोन्ही तालुक्यांतील स्थानिक राजकारणावर या भेटीचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





