मुंबई – शिंदे सेनेच्या नव्या जाहिराती राजकारण चांगलेच तापले आहे. या जाहिरातींवर विरोधकांसह आता भाजपकडूनदेखील नाराजी व्यक्त केली जात आहे. या जाहिरातींवरून बॅनर वार सुरु झाला आहे. भाजप पक्षातील कार्यकर्त्यांकडून आता बॅनर लावून शिंदेंवर टीका केली आहे. तर शिंदे गटाकडूनही भाजपवर बॅनर लावून सडेतोड उत्तर देण्यात आला आहे.
अशात उल्हासनगरात भाजपच आणि शिंदे गटाची बॅनरबाजी पाहायला मिळाली. शिंदे गटाने बॅनर्स लावून भाजपला डिवचलेलं असतानाच आता भाजपने बॅनर्स लावून शिंदे गटाला डिवचले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद प्रचंड विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे.
उल्हासनगर येथे पुन्हा एकदा बॅनरवॉर पाहायला मिळत आहे. भाजपने बॅनर लावत शिवसेना शिंदे गटाला थेट डिवचलं आहे. लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये 50 कुठं आणि 105 कुठं? हा आमच्या भाजपचा मोठेपणा! देवेंद्र फडणवीस साहेब नाम ही काफी है!, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.
या बॅनर्सवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. त्याखाली किंगमेकर असं लिहिलं आहे. याच बॅनर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्यासह पंकजा मुंडे तसेच रवींद्र चव्हाण यांचेही फोटो आहेत. उल्हासनगरला थेट मार्केट एरियामध्येच हे बॅनर्स लागले असल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.