“फडणवीसांनी पुन्हा एकदा माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला”; हिंदी सक्तीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

Harshwardhan Sapkal | राज्यातील शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या इयत्तेपासून सक्तीने शिकवावी लागेल असे घोषित केल्याने याला प्रचंड विरोध झाला होता. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर हा निर्णय मागे घेण्याची वेळ आली. पण त्याबाबत लेखी निर्णय जाहीर करण्यात आला नाही.
यातच मंगळवारी शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री उशिरा शुद्धीपत्रक काढले आहे. त्यानुसार, इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत हिंदी भाषा ‘अनिवार्य’ नसेल, मात्र तिसऱ्या भाषेच्या रूपात ती शिकवली जाणार आहे, यासाठी शालेय शिक्षण विभागाने नवा शासकीय निर्णय जारी केला आहे.
त्यामुळे तिसरी भाषा हिंदीच राहणार असून, राज्य सरकारच्या या नव्या जीआरमुळे मराठी भाषा तज्ज्ञांनी संताप व्यक्त केला आहे. यावरूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर जहरी टीका केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्वीट
“फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला! तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली’ असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली. पण सरकारचा जीआर काय सांगतो? हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा असणार, इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान २० विद्यार्थ्यांची अट, म्हणजेच पर्यायाचा देखावा आणि हिंदी लादण्याचा ठरवलेला कट!” असा घणाघाती आरोप सपकाळ यांनी केला.
फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला!
तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली’ असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली. पण सरकारचा जीआर काय सांगतो?
➡️ हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा असणार,
➡️ इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान २०… pic.twitter.com/JvAr3oHqAX
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) June 18, 2025
भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच
“हा भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच असून हे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना संपवण्याचे कारस्थान आहे. फडणवीस, शिंदे, अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी, मराठी माणसांशी नाही दिल्लीश्वरांशी आहे हेच यातून स्पष्ट होते. वारंवार बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेणा-या शिंदे गटाकडेच शिक्षणखातं असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तशाच प्रकारे मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली आहे,” असे ते म्हणाले.
अजित पवारांवर टीका
“अजित पवार सत्तेसाठी इतके लाचार आहेत की त्यांना तर महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस जगले काय मेले काय ? याच्याशी काही देणे घेणे नाही. फक्त आपल्याला अर्थखातं मिळावे हेच अजित पवारांचे धोरण आहे. संघ आणि भाजपचा हा “ एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृती” चा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावर उठला असून तो झुगारून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही!” अशीही टीका सपकाळ यांनी केली. Harshwardhan Sapkal |
दरम्यान, ‘राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४’ नुसार यापुढे इयत्ता १ ली ते ५ वीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. हिंदीऐवजी इतर भाषाही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची परवानगी असेल. पण त्यासाठी किमान २० विद्यार्थ्यांनी इच्छा दर्शवल्यास, त्या भाषेकरता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येतील, अन्यथा ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. Harshwardhan Sapkal |
हेही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या १० तासांत १२ बैठका, दिग्गज नेत्यांशी चर्चा ; जी-७ शिखर परिषदेत भारताचे वर्चस्व



