फडणवीस सरकारकडून लोकशाहीची थट्टा : पवार

अमोल कोल्हेंसाठी गर्दी

दुपारी एक वाजता सुरू होणारा कार्यक्रम साडेचार वाजता सुरू झाला. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील सिनेस्टार खा. अमोल कोल्हे यांना पाहण्यासाठी सगळ्या स्तरातील लोकांनी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे खिसे साफ केले तर काहींच्या गळ्यातील सोनसाखळ्याही पळविल्या.

शेवगाव – राज्याच्या अनेक भागात पावसाअभावी शेतकरी मेटाकुटीला आला तर काही भागात जनता पुराच्या थैमानाने भयभीत झाली असताना मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या प्रचारात मशगुल आहेत. नैसर्गिक आपत्तीत मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. परंतु या सरकारच्या डोक्‍यात सत्तेची मस्ती शिरली आहे. त्यांनी लोकशाहीची थट्टा चालविली असून माध्यमांची मुस्कटदाबी कृेली जात असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेवगाव येथे आयोजित केलेल्या शिवस्वराज्य यात्रेत ते बोलत होते. खा. डॉ.अमोल कोल्हे, माजी आमदार नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. मेघा कांबळे, अविनाश आदिक, प्रदेश युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जि.प.उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती क्षितीज घुले, संजय कोळगे, अरुण लांडे, रामनाथ राजपुरे, शिवशंकर राजळे, बंडू बोरुडे, सिताराम बोरुडे, राजेंद्र दौंड यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, उद्याच्या काळात मोठमोठे आमिषे दाखवले जातील मात्र सरकारने या मागे दिलेल्या कुठल्याही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. योजना द्यायची पण अशी मेख मारायची की लाभ मिळायलाच नको असे सरकारचे धोरण आहे. वेगवेगळ्या चौकशा व कारवायांची भीती दाखवून अनेकांना पक्षांतर करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.

खा. डॉ. कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रात महाजनादेश व जनआशिर्वाद अशा दोन यात्रा सुरु आहेत. आमची शिवस्वराज्य यात्रा रयतेचे राज्य आणण्यासाठी असून राज्याने ती स्वीकारलेली आहे, लादलेली नाही. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा अशा जाहिराती करून सत्तेवर आलेल्या युती सरकारने जाती-पातीत विष पेरण्याच काम केले. गेल्या पाच वर्षात यांनी महाराष्ट्र खड्ड्यात नेऊन घातला. एक बुरुज ढासळल्याने किल्ला कधी पडत नसतो अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीतून होत असलेल्या पक्षांतर बाबत भाष्य करून आगामी काळात जनतेच्या पाठबळावर पक्ष पुन्हा उभारी घेईल अशी ग्वाही दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×