१) एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाही मागील काही दिवसांपासून महायुतीत काही तरी बिनसल्याची चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध बिघडल्याचे देखील म्हंटले गेले. याचदरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने नाराजीच्या चर्चेत आणखी भर पडली. मात्र या चर्चांवर प्रतिक्रिया देत फडणवीसांनी आमच्या दोघात कुठलाही दुरावा नसल्याचे स्पष्ट केलय. देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये बोलताना सांगितले की, “आमच्या दोघात कोणताही दुरावा नाही, आम्ही आज आणि काल व त्यापूर्वीही परस्परांशी बोललो, एकत्र कार्यक्रमात सहभागी झालो होतो. एकमेकांशी न बोलण्यासारखं काहीही घडलेलं नाही. फक्त माध्यमांनी तसे चित्र निर्माण केले आहे. हा वेड्यांचा बाजार सुरु आहे आणि यामध्ये काही माध्यमे वेडी झाली आहेत.” २) नवी मुंबईत मनसेचं शक्तिप्रदर्शन मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण गेल्या अनेक महिन्यांपासून झालेलं नव्हतं. तसेच महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवली होती. हे बघताच अमित ठाकरेंनी महाराजांच्या पुतळ्यावरील कपडा खराब झाल्याचा आरोप करत पुतळ्याचे अनावरण केले. याप्रकरणी नेरुळ पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार आज ते स्वत: नेरुळमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी मनसेकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी अमित ठाकरें सोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार हे प्रमुख मनसेचे नेते उपस्तिथ होते. ३) मी पोलिसांचा मुलगा; पुण्यात तरुणाचा भररस्त्यात गोंधळ विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात एका तरुणाने भररस्त्यात धिंगाणा घातला. मात्र एवढ्यावरच न थांबता या तरुणाने “मी पोलिसांचा मुलगा आहे” असं म्हणतं दुसऱ्या तरुणाशी जोरदार वाद घातला. सदर घटना रात्री रात्री ११.१५ वाजता पुण्यातील नारायण पेठेत घडली असून पोलिसांनी मध्यस्थी करत हा गोंधळ थांबवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नारायण पेठेत असलेल्या टकले हवेली चौक येथे चैतन्य विजय काळे (वय- 40) हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते तेव्हा त्यांच्या दुचाकीला जितू सुजित हलदर याच्या चारचाकी वाहनाने धडक दिली. दरम्यान, किरकोळ धक्का लागल्याने काळे आणि हलदर यांच्यात वाद सुरू झाले आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली. हा वाद सुरू असताना त्याने “मी पोलिसांचा मुलगा” आहे असं सांगत हा वाद आणखी वाढवला आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ४) स्मृतीच्या वडिलांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या लग्नसोहळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्ट अटॅक आला असून त्यांना उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. स्मृतीचे लग्न लागण्यापूर्वीच ही घटना घडली. त्यामुळे तिचा लग्नसोहळा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. समडोळ येथील मानधना फार्म हाऊसवरच लग्नाची तयारी सुरू असताना ही घटना घडल्याने एकच गोंधळ उडाला. वडिलांना रुग्णवाहिकेतून तात्काळ सांगलीतल्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रुग्णालयामध्ये स्मृती मानधना आणि कुटुंबीय दाखल झाले आहेत. ५) ट्रम्प सरकार उलथवून टाकण्याच्या तयारीत अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देश व्हेनेझुएला यांच्यात तणाव वाढतच आहे. येत्या काही दिवसांत व्हेनेझुएलाविरुद्ध एक नवीन कारवाई सुरू होऊ शकते असे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ट्रम्प प्रशासन व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरुद्ध बंडही करू शकते. रॉयटर्सने अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देत ही माहिती दिली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, ही कारवाई गुप्त कारवाईने सुरू होऊ शकते. हे पाऊल कधी उचलले जाईल किंवा ते किती व्यापक असेल हे अद्याप स्पष्ट नाही, परंतु ट्रम्प प्रशासन त्याबाबत खूप गंभीर आहे हे निश्चित आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन लष्कराने कॅरिबियनमध्ये मोठ्या संख्येने जहाजे, विमाने आणि सैन्य तैनात केले आहेत. ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ६) बंगाल-झारखंड मध्ये ईडीचे ४४ ठिकाणी छापे एका मोठ्या कारवाईत, ईडीने कोळसा घोटाळ्यासंदर्भात पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील ४४ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या छाप्यांमध्ये ईडीच्या पथकांनी १४ कोटी रुपयांहून अधिक किमतीची रोख रक्कम, सोने आणि दागिने जप्त केले. याशिवाय, मालमत्ता कागदपत्रे, जमीन खरेदी-विक्री करार, डिजिटल उपकरणे आणि अनेक कंपन्यांचे अकाउंट बुक्स यासह अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. ही कागदपत्रे कोळसा सिंडिकेटशी जोडली असल्याचे सांगितले जाते. ७) सोनम वांगचुक यांच्याविषयीची उद्या सुनावणी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली जे. अँग्मो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. या याचिकेत गीतांजली जे. अँग्मो यांनी कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत हवामान कार्यकर्त्याची अटक बेकायदेशीर आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी मनमानी कारवाई असल्याचे म्हटले होते. त्यासाठी गीतांजली यांनी सुधारित याचिकेवर केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाकडून उत्तर मागितले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या २४ नोव्हेंबरच्या लिस्टनुसार, ही याचिका न्या. अरविंद कुमार आणि न्या. एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी येणार आहे. लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये केंद्रशासित प्रदेशात चार जणांचा मृत्यू आणि ९० जण जखमी झाल्यानंतर २६ सप्टेंबर रोजी वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) ताब्यात घेण्यात आले होते. ८) न्या. सूर्यकांत नवे सरन्यायाधिश, न्या. भूषण गवई यांची घेणार जागा- जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे, बिहार मतदार यादी पुनरावृत्ती आणि पेगासस स्पायवेअर प्रकरण यावरील अनेक ऐतिहासिक निकाल आणि आदेशांचा भाग असलेले न्या. सूर्यकांत सोमवारी भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते आता निवृत्त होणाऱ्या न्या. भूषण गवई यांच्या जागी येतील. न्या. सूर्यकांत यांची ३० ऑक्टोबर रोजी पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि ते जवळजवळ १५ महिने या पदावर राहतील. ते ९ फेब्रुवारी २०२७ रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी निवृत्त होतील.१० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील हिसार जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले न्या. सूर्यकांत हे एका छोट्या शहरातील वकील असल्याने देशातील सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथे त्यांनी राष्ट्रीय महत्त्वाच्या आणि संवैधानिक बाबींवरील अनेक निर्णय आणि आदेशांचा भाग म्हणून काम केले आहे. ९) लग्न करण्याची इच्छा आहे का? अभिनेत्री तनुश्री दत्ताचं भन्नाट उत्तर बॅालीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपला एक काळ गाजवला आहे. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे तनुश्री दत्ता. एकेकाळी बॅालीवूड इंडस्ट्रीमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. अभिनेता इमरान हाशमीसोबत ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटात तिने स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटात तनुश्रीने दिलेल्या इंटीमेंट सीनची बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे अभिनेत्री प्रकाशझोतात आली. पण त्यानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय तनुश्री दत्ताने घेतला. अभिनेत्री तनुश्री दत्ता विविध कारणांमुळे सतत चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विचारलेल्या एका प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा होत आहे. लग्न करण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न तनुश्रीला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, हो. लग्न करायचं आहे. तनुश्रीला एका संताने सांगितले आहे की, तिच्या नशिबात लग्न आणि मूल या दोन्ही गोष्टी आहेत. असे सांगत संताने सांगितलेली गोष्ट तिने शेअर केली. १०) ‘तू घरी खेळतोय का?’ कुलदीपवर संतापला कर्णधार ऋषभ भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुवाहाटीत खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सेनुरन मुथुसॅमीच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विकेट्स घेण्यासाठी अक्षरशः खूप कष्ट घ्यावे लागले. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ऋषभत पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पंत कुलदीपला म्हणाला, “यार, ३० सेकंदांचा टायमर आहे, तू घरी खेळतोय का? एक बॉल टाक चल लवकर. यार कुलदीप दोन्ही वेळा वॉर्निंग मिळालीय. पूर्ण एक षटक थोडी टाकायला सांगतोय. कसोटी क्रिकेटची थट्टा करून ठेवली आहे.” पंतच्या फटकारानंतर कुलदीपने तातडीने गोलंदाजी सुरू केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.