नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; उत्तर प्रदेशप्रमाणे कायदा तयार करणार

Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.23) नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशप्रमाणे कुंभमेळा कायदा तयार करणार असल्याचे म्हटले आहे.
नाशिकप्रमाणे त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे. यावर भर दिला जाईल आणि विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही आश्वासन त्यांनी दिले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा होता. यावेळी फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात अभिषेक केला. त्यांच्यासोबत गिरीश महाजन आणि दादा भुसेही उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेतले आणि परिसराची पाहणी केली. त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा तयार केला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा विकास झाला पाहिजे. देशभरातील लोक तिथे येतात. कॉरिडॉर तयार करणे, पार्किंग, शौचालय तयार करणे, मंदिरं आणि कुंडाची दुरूस्ती करणे. एसटीपीचे जाळे तयार करून पाणी शुद्ध राहिले पाहिजे, या दृष्टीने एक आराखडा तयार करण्यात आला आहे.”
निधीची कमतरता पडू देणार नाही
“कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी त्याचे काम पूर्ण करायचे, असा प्रयत्न केला जाणार आहे. या कामाला खूप मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. पण आम्ही राज्य सरकार म्हणून याला कुठल्याही निधीची कमतरता पडू द्यायची नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामांसाठी आवश्यक निधी आम्ही उपलब्ध करून देऊ,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
प्राधिकरणाची स्थापना करणार
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पहिला टप्पा हा सिंहस्थापर्यंत करता येईल. उत्तरप्रदेशमध्ये महाकुंभच्या पार्श्वभूमीवर कायदा तयार करण्यात आला, आपणही तसाच कायदा करणार आहोत. आपणही प्राधिकरण तयार करून याला पूर्ण कायदेशीर चौकट देत आहोत. त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी कुंभमेळा होणार आहे. हे प्राधिकरण प्रशासकीय प्राधिकरण आहे. Devendra Fadnavis |
काही साधू महंतांनी नाशिक कुंभमेळा असा उल्लेख होत असल्याने या कुंभमेळ्याचा उल्लेख नाशिक-त्र्यंबक कुंभमेळा असा करावा, अशी मागणी केली. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नाशिक आणि त्र्यंबक अशा दोन्ही ठिकाणी हा कुंभमेळा होतो. नाशिक लोकांना अधिक माहिती आहे. पण त्र्यंबकेश्वरचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघेही एकत्र असलेले शिवलिंग त्र्यंबकेश्वरला आहे. म्हणून आपल्या संपूर्ण अध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्र्यंबकेश्वरचा दर्जा वरचा आहे. त्यामुळे त्यांनी जी काही मागणी केली आहे ती मागणी आम्ही मागणी करू,” असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिली. Devendra Fadnavis |
हेही वाचा:
राज ठाकरेंचा मोठा निर्णय; मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी ‘या’ व्यक्तीची केली निवड





