Maharashtra Election – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांतर होत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातही दोन बड्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे. त्यातील एक हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित हे आहेत. तर दुसरे हे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी हे आहे. या दोघांनी ही विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. हे दोघेही शहादा-तळोदा मतदार संघातून काँग्रेसकडून इच्छुक आहेत. राजेंद्र गावित हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. ते शहादा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीही मागितली आहे. राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीसाठी उपस्थित होते. त्यांना उमेदवारी मिळाल्यास विद्यमान भाजप आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढू शकते. दुसरीकडे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनीही जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. उदेसिंग पाडवी हेही काँग्रेसमधून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांनी पक्षसदस्य राजीनामा दिलेला नाही.आपल्याला आघाडीकडून उमेदवारी मिळावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. तेही गावित यांच्या प्रमाणेच शहादा मतदार संघातून इच्छुक आहेत.