पिंपरी | उद्योगांना थेट सुविधा द्या, एजेंट नको

पिंपरी, (प्रतिनिधी) -औद्योगिक परिसरामध्ये मुलभूत सुविधांसाठी देखील उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे आणि औद्योगिक परिसरात सुविधा पुरविण्यासाठी एजेंट्सचा सुळसुळाट वाढला आहेपिंपरी चिंचवड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र अधिकारी अथवा स्वतंत्र कक्ष निर्माण करावा आणि उद्योगांना थेट सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
उद्योगांकडून महापालिकेला मोठ्या प्रमाणात कर दिला जातो आणि या बदल्यामध्ये मुलभूत सुविधा देखील पुरविल्या जात नाहीत. मध्यंतरी बैठकीत महापालिकेच्या वतीने आश्वासन दिले होते की, लवकरच या समस्या सोडवू परंतु प्रत्यक्ष कृती झाली नाही. गेली 40 ते 50 वर्ष उद्योजक अनेक समस्यांमुळे त्रस्त आहेत परंतु शासनाकडून उद्योजकांना सोयी सुविधा मिळविण्यात अडचण येते.
औद्योगिक परिसरात स्वच्छता, आरोग्य, वीज, कर, प्रॉपर्टी ट्रान्सफर उद्योग धंदा परवाना यासारख्या अनेक सुविधा उद्योजकांपर्यंत पोहोचत नाही. या सुविधा घेण्यासाठी उद्योजकांना कोणत्या खात्याकडे जावे तेच समजत नाही त्यामुळे एजंट लोकांचा सुळसुळाट वाढला आहे. यामुळे उद्योजकांना मोठे भुर्दंड पडतात व काही वेळेला दंडात्मक कारवाईला सुद्धा सामोरे जावे लागते.
परिसरात सहा ते सात हजार छोटे मोठे उद्योग असून कामगारांची संख्या दोन ते तीन लाखाच्या वर आह तरीही स्वतंत्र अधिकारी व स्वतंत्र कक्ष नाही. उद्योग समस्या निवारण स्वतंत्र कक्ष उभारावा अशी मागणी इंडस्ट्रीज असोसिएशन आणि फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.





