नगर, दि. 23 – शहरात वाढत असलेली गुन्हेगारी, दंगली, महिला मुलींची सुरक्षितता यासह अन्य गुन्ह्यांवर नजर ठेवण्यासाठी आता शहरातील प्रमुख चौकांसह रस्त्यांवी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे. सध्या शहरात 173 कॅमेरे बसविण्यात आले असून या सर्वांचे नियंत्रण थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातून होत आहे. लवकरच आणखी कॅमेरे बसविण्यात येणार असून पुढील आठवड्यात या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
पोलिस अधीक्षक कार्यालयात तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाची पाहणी खा. विखे व अधीक्षक राकेश ओला यांनी केली. यावेळी उपअधीक्षक अनिल कातकडे, कमलाकर जाधव आदी उपस्थित होते. खा. विखे म्हणाले की, संपूर्ण शहरात या सीसीटीव्ही कॅमेराद्वारे पोलिसांची नजर राहणार आहे. यामुळे काही घटना रोखण्यासाठी मदत होईल. तसेच या कॅमेऱ्यांच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या स्पीकरद्वारे नियंत्रण कक्षातून थेट संबंधित ठिकाणी असलेल्या नागरिकांशीही संपर्क साधता येणार आहे. येत्या काळात या कॅमेऱ्यांच्या ठिकाणी अलर्ट सिस्टीमही कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.
पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आणखी पाचशे ते सातशे कॅमेरे शहर व उपनगर परिसरात बसविण्यात येणार आहेत.त्यामुळे शहरातील गुन्हेगारी घटनांना, चेन स्नॅचिंग सारख्या घटनांना चाप बसणार आहे. तसेच तपासात पोलिसांना मदतही होईल, असा विश्वास खासदार विखे पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुढील आठवड्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.