लक्षवेधी : त्यांचा चष्मा हवा कशाला?

पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे वक्तव्य कमालीचे चर्चेचे ठरले. त्यांच्या वक्तव्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
भारताच्या पंतप्रधानांचा अमेरिका दौरा झाला. तो यशस्वी झाला असे मानायला हरकत नाही, त्याचे कारण भारताच्या दोन शेजारी देशांत त्या दौऱ्यामुळे उमटलेल्या प्रतिक्रिया. अर्थात, भारताने त्यावर हुरळून जाण्याचे कारण नाही. अमेरिका आपला फायदा बघते. त्यांना चीनपेक्षा आपण अधिक विश्वासार्ह वाटतो आहे म्हणून त्यांच्याकडूनच जवळीक साधण्याचा प्रयत्न होतो आहे. आपण विनाकारण घोड्यावर बसण्याचे काही कारण नाही. संयम आणि सतर्कतेने सगळ्या बाबी पार पाडल्या जाऊ शकतात. या दौऱ्याचे कवित्व अजूनही भारतात सुरू आहे. पण त्याहीपेक्षा अधिक चर्चा झाली ती बराक ओबामा यांच्या वक्तव्याची.
त्यांनी भारतीय पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या सुमारास जे वक्तव्य केले ते भारतातील आणि जगातील एका गटाने हातोहात उचलले. त्याला प्रसिद्धीही दिली गेली. काही भारतीय नेत्यांनी त्याला (त्यांना मिळालेल्या सूचनेनुसार) लगोलग प्रत्युत्तर दिले. ते देण्याची आवश्यकता होतीही आणि नव्हतीही. अर्थात प्रत्युत्तर दिले म्हणून काही वाईट झाले असे नाही. पण भारताकडे बोट दाखवताना अमेरिकेच्या माजी अध्यक्षांनी आणि एकूणच अमेरिकेने कधीतरी आपल्या भूतकाळातही डोकावण्याची तसदी घ्यावी. तसे केले तर कोणाबाबत काही बोलल्यावर चार बोटे आपल्याकडेही रोखली जातील याची त्यांना समज येईल.
भारताच्या पंतप्रधानांच्या भेटीच्या अगोदर ओबामा यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारतातील मुस्लिमांच्या सुरक्षेबाबत बोलायला हवे, आपणही तेच केले असते, असे ओबामा म्हणाले. त्यांनी पूर्वीही असेच विधान केले होते. भारतातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची काळजी त्यांना वाटते. अमेरिकेसारख्या जगाची काळजी वाहणाऱ्या देशाच्या माजी राष्ट्रप्रमुखाला ती वाटली असेल तर त्यात गैर काही नाही. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र त्याचवेळी आपल्या पायाखाली काय जळते आहे आणि खुद्द आपल्या स्वत:च्या कार्यकाळात काय काय घडले आहे व विद्यमान स्थिती काय आहे याचाही ओबामांसारख्या मोठ्या नेत्याने विचार करायला हवा. काही व्यक्ती पदांमुळे मोठे होतात, तर काही व्यक्तींमुळे पद मोठे होते. ओबामा हे दुसऱ्या वर्गातील. त्यांच्यामुळे निश्चितच अमेरिकेच्या अध्यक्षपदाची प्रतिष्ठा वाढली. त्यांच्यानंतरच्या डोनाल्ड ट्रम्प यांची वर्तणूक पाहिल्यावर तर ओबामा यांचे मोठेपण अधिकच ठसठशीतपणे जाणवले. तथापि, मोठ्या नेत्यांच्या चुकाही मोठ्याच असतात आणि ते जे बोलतात अथवा करतात त्या सगळ्याच बाबी बरोबर असतातच असे नाही. त्यांनी केलेली एखादी कृती केवळ त्यांच्या देशाच्या लाभाची अथवा हिताची असते.
याचा अर्थ त्याचा जगातील अन्य समुदायावर परिणाम होत नाही असे नाही. अमेरिकेने जगातल्या अनेक देशांना त्यांच्या किमान जगण्यास सुसह्य असलेल्या स्थितीतून त्यापेक्षा मरण बरे असे म्हणण्यापर्यंत लोटले आहे. सीरिया, अफगाणिस्तान, लिबिया, सोमालिया, येमेन आणि त्याच्याही अगोदर इराक येथे अमेरिकेने मानवतेच्या रक्षणासाठी केलेली कथित कारवाई पाहिली तर कदाचित अमेरिकेच्या दृष्टीने ती बरोबर असेलही. मात्र कारवाईनंतर त्यांनी अंग काढून घेतल्यानंतर त्या देशांमध्ये काय स्थिती आहे याची दखल अमेरिकेने घेतली का? मुळात यातील इराकच्या विरोधातील कारवाई जॉर्ज बुश ज्यूनिअर यांच्या कार्यकाळातील. अन्य देशांमध्ये जे काही ड्रोन हल्ले, बॉम्बहल्ले झालेत ते खुद्द ओबामा यांच्याच कार्यकाळात झाले आहेत. ही सगळी मुस्लीम राष्ट्रे आहेत. अमेरिकेच्याच एका वाहिनीने दिलेल्या आकडेवारीनुसार ओबामांच्या काळात वर नमूद केलेल्या देशांमध्ये दिवसाला किमान 72 वेळा बॉम्बहल्ले केले गेले. याचा अर्थ तासाला तीन बॉम्ब अमेरिका या देशांत टाकत होती. दहशतवादी, कट्टरवादी, मानवतेचे शत्रू, अमेरिकेचे शत्रू अशी विविध नावे देऊन करण्यात आलेल्या या हल्ल्यांत मारले गेलेले सगळेच दहशतवादी नव्हते.
अमेरिकेच्याच प्यू रिसर्च नावाच्या संस्थेनेही एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या 80 टक्के आफ्रिकन अमेरिकींना, 42 एशियन अमेरिकींना आणि 46 टक्के हिस्पॅनिक अमेरिकींना भेदभावाची वागणूक दिली जाते. काही वर्षांपूर्वी एका अश्वेत व्यक्तीची किती थंडपणे एका पोलिसाने हत्या केली होती ते सगळ्या जगाने पाहिले आहे. त्या अनुशंगाने विचार केला तर या भेदभावाचे स्वरूप किती तिव्र असेल याची कल्पना करता येऊ शकते. ओबामा यांनाही आणि आताच्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनालाही त्यांच्याच माध्यमांनी मांडलेल्या या आकडेवारीची निश्चितच माहिती असणार. याउलट भारतातील 98 टक्के अल्पसंख्याकांना भारतात सुरक्षित वाटते आणि त्यांना त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य असल्याचे त्यांनीच म्हटले असल्याचे याच अहवालात म्हटले आहे.
ूभारतात आज एका विशिष्ट विचारसरणीचे सरकार आहे. भारतातील अगोदरची सरकारे मध्यममार्गी होती. त्यांच्या तुलनेत आताचे सरकार वेगळे आहे व सत्ताधारी पक्षाच्या इतिहासातही काही त्रुटी आहेत व बोट ठेवता येऊ शकतील अशा चुका दाखवल्या जातात. आताही काही मुद्द्यांवरून ओबामा म्हणतात त्या एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याच्या घटना घडत आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अगदी यादवी माजली आहे एवढे भयावह नाही. भारतातील अल्पसंख्य समुदायालाही त्याची कल्पना आहे. मात्र विषयाचे ज्यांना राजकियीकरण करायचे असते त्यांच्याकडून आणि देशातल्या आणि जगातल्या एका गटाकडून त्याचे भांडवल केले जाते हेही तेवढेच खरे. मुळात भारतात राहणाऱ्या प्रत्येक समुदायाला आपण कितपत सुरक्षित आहोत याची जाणीव आहे. त्यामुळे त्यांचे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक असे वर्गीकरण करून नसलेली दरी रूंदावण्याचा प्रयत्न सगळ्यांनी जबाबदारीने हाणून पाडणेच देशाच्या हिताचे.
त्याकरता सगळ्यांत प्रथम आवश्यकता आहे ती परकीयांच्या चष्म्यातून स्वत:कडे बघणे टाळण्याची. त्याचे कारण दुसऱ्याच्या घराकडे आणि त्यातल्या उणिवांकडे बोट दाखवणारा कोणी नि:स्वार्थ भावनेने ते करत नसतो. त्याचा अंतस्थ हेतू वेगळाही असू शकतो. ओबामांसारख्यांच्या विधानाचे भांडवल करणाऱ्यांनाही ते लागू होते. भारतातील अल्पसंख्य असुरक्षित आहेत हे त्यांच्या मनावर बिंबवणे सर्वप्रथम बंद केले पाहिजे. त्यांना अल्पसंख्य म्हणणाऱ्यांनी जगातल्या कितीतरी देशांतील त्यांच्या समुदायाच्या लोकसंख्येपेक्षा त्यांची भारतातील लोकसंख्या अधिक आहे व ते येथे सन्मानाने राहत आहेत याचीही नोंद ठेवावी. घरातले प्रश्न घरातलेच असतात. प्रत्येक समुदायात चुकीच्या मार्गाने जाणारी मंडळीही असतात आणि बहुसंख्यही त्याला अपवाद नाहीत. अशा सगळ्यांना प्रवाहात आणले तर सगळे प्रश्न सुटतील.
कांचन जोशी


