लक्षवेधी : डिजिटल पॅरानोइया
डिजिटल पॅरानोइयामागे मानसिक आणि तांत्रिक अशी दोन्ही प्रकारची कारणे असू शकतात. मोबाइलचे अतिप्रमाणात व्यसन लागल्यास मेंदूतील डोपामाइन या रसायनाच्या कार्यपद्धतीवर परिणाम होऊ शकतो.

– संजय कडू
आपला मोबाइल हॅक केला आहे किंवा आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा काही जणांना विनाकारण संशय येतो. त्यानंतर ते लोक थेट सायबर पोलिसांकडे धाव घेतात.
स्मार्टफोन, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे माणसाचे आयुष्य अधिकाधिक डिजिटल होत असताना त्याचबरोबर मानसिक असुरक्षिततेची भावनाही वाढू लागली आहे. आपला मोबाइल हॅक झाला आहे, वैयक्तिक माहिती चोरीला जात आहे, कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवत आहे, आपले संभाषण ऐकले जात आहे, अशा संशयांनी अनेकांना ग्रासले आहे. या सततच्या भीतीतून निर्माण होणार्या मानसिक अवस्थेला ‘डिजिटल पॅरानोइया’ असे म्हटले जाते. विशेष म्हणजे, या समस्येचा विळखा केवळ तरुण पिढीलाच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांनाही बसू लागला आहे. डिजिटल जगातील प्रत्येक गोष्टीत फसवणुकीचा धोका शोधणार्या काही व्यक्ती आता थेट सायबर पोलीस ठाण्याची दारे ठोठावत आहेत.
मोबाइलवरील विविध अॅप, सोशल मीडिया आणि इंटरनेटचा अतिवापर करणार्या व्यक्तींमध्ये ही मानसिक अस्वस्थता अधिक जाणवते. आपले पासवर्ड, बँक खात्याचे तपशील, वैयक्तिक फोटो किंवा इतर माहिती कोणीतरी चोरून घेतली असेल, अशी भीती त्यांना सतत वाटत असते. काहींना तर मोबाइलचा कॅमेरा, मायक्रोफोन किंवा लोकेशनच्या माध्यमातून कोणीतरी आपल्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत असल्याचा संशय येतो.
परिणामी, अनोळखी ई-मेल, मेसेज किंवा लिंक तर सोडाच; अनेकदा ओळखीच्या व्यक्तींनी पाठवलेल्या लिंकवरही त्यांचा विश्वास बसत नाही. प्रत्येक फोन, प्रत्येक मेसेज आणि प्रत्येक डिजिटल व्यवहारामागे काहीतरी कट किंवा फसवणूक असल्याची शंका त्यांच्या मनात घर करते. या मानसिक अवस्थेची तीव्रता वाढल्यास व्यक्तीच्या वर्तनातही बदल दिसू लागतात. काही जण मोबाइलवर कोणताही कॉल किंवा व्हिडिओ कॉल सुरू नसतानाही समोर एखादी व्यक्ती असल्याप्रमाणे बोलताना, तिला दम देताना किंवा रागावताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणीही असे प्रकार घडतात. आजूबाजूचे लोक आपल्याकडेच पाहत आहेत किंवा आपल्याबद्दलच चर्चा करीत आहेत, अशी भावना काहींमध्ये निर्माण होते. त्यामुळे त्यांच्या सामाजिक व कौटुंबिक आयुष्यावरही परिणाम होऊ लागतो.
वाढती अस्वस्थता
डिजिटल पॅरानोइयामागे मानसिक आणि तांत्रिक अशी दोन्ही प्रकारची कारणे असू शकतात. मोबाइलचे अतिप्रमाणात व्यसन लागल्यास मेंदूतील डोपामाइन या रसायनाच्या कार्यपद्धतीवर परिणाम होऊ शकतो. सतत मोबाइल तपासणे, नवीन नोटिफिकेशन आले आहे का हे पाहणे, सोशल मीडियावरील प्रतिक्रिया तपासणे, यामधून मेंदूला वारंवार उत्तेजना मिळत राहते. ही सवय हळूहळू व्यसनाचे स्वरूप धारण करू शकते.
याची तुलना एखाद्या व्यक्तीच्या दातात बडीशेपचा कण अडकण्याशी करता येईल. तो कण काढण्यासाठी ती व्यक्ती सतत जीभ फिरवत राहते. कितीही प्रयत्न केले तरी तो कण निघेपर्यंत तिचे लक्ष दुसरीकडे लागत नाही. अगदी त्याचप्रमाणे डिजिटल व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्ती वारंवार फेसबुक, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तपासत राहते. मोबाइलमधील विविध अॅप डाउनलोड करणे, डिलीट करणे, जीपीएस बंद ठेवणे, पासवर्ड बदलणे, सिक्युरिटी सेटिंग तपासणे असे प्रकार सुरू होतात.
त्यातच एखादा संशयास्पद फोन किंवा फ्रॉड कॉल आल्यास अस्वस्थता आणखी वाढते. हा फोन मलाच का आला? माझा नंबर कोणाकडे गेला? कोण माझी माहिती गोळा करीत आहे? कोण माझा पाठलाग करीत आहे? असे प्रश्न सतत सतावू लागतात. परिणामी, प्रत्यक्ष धोका नसतानाही व्यक्ती कायम भीतीच्या सावटाखाली वावरू लागते.
नेटवर्क अडचणीचा परिणाम
मोबाइल नेटवर्कमधील अडचणी आणि तांत्रिक बिघाड यातूनही या संशयाला खतपाणी मिळते. काही ठिकाणी नेटवर्क व्यवस्थित चालत नसल्याने नागरिक वारंवार मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्या बदलतात. काही जण दोन वेगवेगळ्या कंपन्यांची सिमकार्ड वापरतात. नेटवर्क खंडित होणे, कॉल ड्रॉप होणे किंवा इंटरनेटचा वेग कमी होणे, अशा सामान्य तांत्रिक समस्यांमागेही काहीतरी संशयास्पद घडत असल्याची भावना निर्माण होते. मोबाइल हॅक झाल्यानंतर तो गरम होतो, अशी अनेकांची समजूत असते. प्रत्यक्षात मोबाइलचा अधिक वापर, बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले अॅप किंवा बॅटरीवरील ताण यामुळेही मोबाइल गरम होऊ शकतो. मात्र, याच सामान्य बाबीचा काही जण हॅकिंगशी संबंध जोडतात. विशेषतः रात्री उशिरापर्यंत मोबाइल वापरण्यामुळे झोपेचे चक्र बिघडते. पुरेशी झोप न झाल्यास मेंदूवर ताण येतो. त्यातून चिडचिड, अस्वस्थता, एकाग्रतेचा अभाव आणि संशयी वृत्ती वाढण्याची शक्यता असते.
डिजिटल डिटॉक्स प्रभावी उपाय
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख अजय दुधाणे सांगतात की, मद्य आणि अमली पदार्थांच्या व्यसनाप्रमाणेच मोबाइलच्या व्यसनाकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे व्यक्तीच्या मानसिक अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. डोपामाइनशी संबंधित मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमवरही त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे मोबाइलचा वापर गरजेपुरताच करणे महत्त्वाचे आहे.
झोपताना मोबाइल बाजूला ठेवणे किंवा बंद करणे, अनावश्यक अॅप डिलीट करणे, सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवणे आणि कुटुंबीयांसोबत प्रत्यक्ष संवाद वाढविणे आवश्यक आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी डिजिटल फसवणुकीच्या घटनांपासून सावध राहण्यासाठी अनावश्यक अॅप आणि ऑनलाइन व्यवहार टाळावेत. ज्यांना इंटरनेटचा वापर आवश्यक नाही, त्यांनी साध्या बटणाच्या मोबाइलचा पर्याय निवडण्याचाही विचार करावा. इंटरनेटचा वापर करायचा असल्यास शक्यतो संगणकावर आणि आवश्यक तेवढाच करावा, असा सल्लाही दुधाणे देतात.
तंत्रज्ञान माणसाचे आयुष्य सुलभ करण्यासाठी आहे; मात्र त्याच तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे माणूसच भीती आणि संशयाच्या जाळ्यात अडकत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. डिजिटल सुरक्षेसोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणेही आता तितकेच गरजेचे बनले आहे.
हॅकिंगच्या तक्रारीत तथ्य नाही
पुणे सायबर पोलीस ठाण्यात गेल्या 5 ते 6 महिन्यांत अशा प्रकारच्या तक्रारी विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणार्या तरुण-तरुणींकडून करण्यात आल्या. तक्रारींच्या अनुषंगाने संबंधितांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. मात्र, तपासात मोबाइल हॅक झाल्याचे किंवा त्यांच्यावर कोणी पाळत ठेवत असल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. मोबाइलच्या अतिवापरामुळे निर्माण होणारे धोके त्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच त्यांचे समुपदेशनही करण्यात आले, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी सांगितले की, संबंधित तक्रारदारांच्या मोबाइलमधील सर्व तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या. मात्र, मोबाइल हॅक झाल्याचे अथवा कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवत असल्याचे निदर्शनास आले नाही.





