– जयंत माईणकर शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन बृह्न्मुंबईची निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. महायुतीत जागा वाटपाचा प्रश्न आहेच. त्यामुळे या निवडणुकीत अनपेक्षित वळण आले आहे. बृह्न्मुंबई महानगरपालिकेत (बीएमसी) 227 जागांसाठी लढत होणार असून, सुमारे 74,427 कोटी रुपयांच्या बजेटची ही महापालिका राजकीयदृष्ट्या सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. मात्र, यंदाची निवडणूक पूर्वीपेक्षा वेगळी ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये थेट टक्कर अपेक्षित असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि ठाकरे बंधूंची एकी यामुळे बहुरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात ‘दोन्ही पवार’ म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिकेचा मोठा वाटा आहे. सत्ताधारी महायुती (भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी) मुंबईत एकत्र लढण्याची घोषणा करत असली, तरी अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. भाजप आणि शिंदेसेना मुंबईत मुख्य भूमिका घेणार असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फारशा जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. नवाब मलिक यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याने जागावाटपात अडथळे येत आहेत. अजित पवार गटाने मुंबईत 50 हून अधिक जागांची मागणी केली आहे, पण भाजपने शिंदेसेनेला 2017 मधील 84 जागा देण्यास नकार दिल्याने तणाव वाढला आहे. काही बातम्यांनुसार, अजित पवार मुंबईत स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. यामुळे महायुतीची एकी तुटली तर मुंबईत त्रिकोणी लढत निश्चित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती एकत्र लढेल असं सांगितलं असलं तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार गट स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी (काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी) मध्येही एकजूट दिसत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये 20 वर्षांनंतर एकी झाली आहे. आपल्या राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधू एकत्र आले असून भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. महाविकास आघाडी मुंबईत फुटली असून, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी हे आघाडीत उरले आहेत. याचा अर्थ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत मुंबईत पाहायला मिळेल. शरद पवार गट मुंबईत ठाकरे गट आणि मनसेसोबत लढण्यास इच्छुक आहे. त्यांनी 22 ते 50 जागांची मागणी केली आहे. मात्र, काँग्रेसला मनसेचा समावेश मान्य नाही. कारण, मनसेची हिंदी भाषिक विरोधी भूमिका आणि परप्रांतीयांना होणारी मारहाण यामुळे काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यास विरोध केला होता. काँग्रेसने अल्पसंख्याक आणि दलित मतदार गमावण्याच्या भीतीने स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. काँग्रेस नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युतीच्या चर्चा करत होते. पण नेहमीप्रमाणे या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही आणि शेवटी काँग्रेसने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली. यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली तर विरोधकांच्या मतांचं विभाजन होऊन महायुतीला फायदा होईल. राष्ट्रवादी काँग्रेसची फूट ही मुंबई निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. शरद पवार गट महाविकास आघाडीत राहून ठाकरे बंधूंसोबत लढण्याची तयारी दाखवत आहे. तर अजित पवार गट महायुतीत असला तरी मुंबईत जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पवार गट एकत्र येण्याची चर्चा आहे, पण मुंबईत मात्र ते विरोधात असतील. अजित पवारांनी नवाब मलिक यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिली असली तरी भाजपच्या विरोधामुळे त्यांचं मनोबल खचलं आहे. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना महत्त्व देऊन एकत्र लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक नेहमीच राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकते. 2017 मध्ये शिवसेनेने 84, तर भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या. यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमुळे समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. मतदार यादीत दुबार नावं आणि प्रभाग रचनेत बदल यामुळेही वाद आहे. महाविकास आघाडीने दुबार मतदारांची नावे काढण्याची मागणी केली आहे. एकूणच, महायुतीची अंतर्गत भांडणं, महाविकास आघाडीतील मनसेवरून वाद आणि दोन्ही पवार गटांच्या स्वतंत्र भूमिका यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत त्रिकोणी संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे बंधूंची एकी झाल्यामुळे विरोधकांची ताकद वाढेल, पण काँग्रेस बाहेर पडली तर मतविभाजन होईल. अजित पवार स्वतंत्र लढले तर महायुतीला धक्का बसेल. येत्या काही दिवसांत जागावाटप आणि युतीच्या घोषणा होताच चित्र स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी मुंबईची लढत अतिशय चुरशीची आणि अनपेक्षित वळणांची ठरणार आहे.