Nagar | कोट्यवधींचे अनुदान लाटून कारखानदारांकडून ऊस उत्पादकांची लूट

नेवासा,(वार्ताहर) – मुळा आणि ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यांची एकहाती सत्ता गेल्या ५० वर्षांपासून प्रस्थापित कारखानदारांच्या ताब्यात असताना आता हे दोन्ही कारखानदार एकत्र आल्यामुळे शेतकऱ्यांची कामधेनू तोट्यात कशी चालते? एकीकडे ६५० कोटींचा तोटा दाखवणारे कारखानदार मात्र हजारो कोटींचे मालकच कसे होत आहेत?
त्यांना जर आपले साखर कारखाने नीट चालविता येत नसतील तर प्रस्थापित कारखानदारांनी आता वेळीच बाजूला व्हावे, असे आव्हान भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
पेचे यांनी मुळा आणि ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यांची जन्म कुंडलीच बाहेर काढून साखर सम्राटांच्या कडू कारनाम्याची गोड कहाणी माध्यमांसमोर मांडली. साखर सम्राटांची पोलखोल करून गैरकारभार चव्हाट्यावर मांडला.
पेचे म्हणाले की, एकीकडे खासगी साखर कारखाने कर्ज काढून नफ्यात चालवित असताना दुसरीकडे हे दोन सहकारी साखर कारखाने कोट्यवधी रुपयांचे अनुदान घेऊन तोट्यात कसे चालले,
शेतकऱ्यांच्या ऊसाला इतर कारखान्यांपेक्षा टनामागे पाचशे रुपये कमी भाव देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसेही देत नाहीत तर दुसरीकडे कामगारांचे पगारही वेळेवर केले जात नाहीत.
असे असताना या साखर कारखान्यामधून स्वत: च्या वाहनांसह नातेवाईकांच्या गाड्यांनाही फुकट डिझेल भरून शेतकऱ्यांच्या पैशांची दिवसाढवळ्या कारखानदार उधळपट्टी करत असल्याचा आरोप केला.
शंभर एकर शेती असणारा पाटील आज भिकारपती झालेला असून कारखानदारांची १० हजार कोटींची संपत्ती कशी काय झाली? सर्वसामान्य शेतकऱ्यांची तुम्ही केवळ पिळवणूकच सुरू केलेली असून साधी ऊसाला तोड द्या म्हणून संचालकांना विनंती केली तर ते शेतकऱ्यांना सांगतात आमच्या हातात काहीच नाही.
साहेबांकडे बंगल्यावर जावून भेटा, असे सांगून शेतकऱ्यांची एक प्रकारे तुम्ही थट्टाच चालविली आहे. पन्नास – शंभर किलोमीटरवर असणारा प्रवरानगर कारखान्याची स्थिती पाहिली तर शाळा, महाविद्यालय,
हॉस्पिटलमध्ये सभासदांना आवश्यक सोयीसुविधा शेतकऱ्यांना मोफत देत असताना मग या सुविधा आपले कारखानदार पन्नास वर्षात का तयार झालेले नाहीत? असा सवालही पेचे यांनी साखर सम्राटांना केला आहे.
आता तोट्यात चालू असलेले हे कारखाने खासगी करून मालकी हक्क करण्याचा या कारखानदारांचा डाव असल्याची शंका येत आहे. या पत्रकार परिषदेला भाजपाचे युवानेते मनोज पारखे, निरंजन डहाळे आदी उपस्थित होते.
मुरकुटे, लंघेंवर टीकेचे बाण
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांच्यावरही सडकून टीका केली.
शेतकऱ्यांच्या अडवणुकीबाबत ते दोघेही काही बोलत नसल्यामुळे नेवासा तालुका हा काही षंढ नसून तालुक्याला हे सर्व प्रकार ज्ञात आहे.
एकाच मातीत आणि एकाच शेतात पिकविलेला ऊस बाहेरचे ५० – १०० किलोमीटरवरील कारखानदार टनामागे ५०० रुपये जादाचा भाव देत असताना आपले कारखानदार का देत नाहीत? असा सवाल पेचे यांनी उपस्थित केला. येथून पुढे आपली भूमिका बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, अशी ठेवून अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणार असल्याचे पेचे यांनी स्पष्ट केले.





