Jamkhed News : जामखेडमध्ये RTO पथकावर ‘वसुली गँग’चे आरोप; ऑनलाईन दंडाच्या नावाखाली दडपशाही, गाड्यांच्या चाव्या हिसकावल्याचा दावा
Jamkhed News : अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, दंड ऑनलाईन प्रणालीवर टाकलेला असतानाही कर्मचाऱ्यांची भूक भागत नाही. ऑनलाईन प्रणालीनुसार चालकाला दंड भरण्यासाठी वेळेची मुभा असते.

जामखेड : जामखेड शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अधिकाऱ्यांनी गुंडगिरी आणि मनमानीचा कळस गाठला आहे. तपासणीच्या नावाखाली रस्त्यावर उतरलेल्या RTO पथकाचा कारभार म्हणजे उघडउघड ‘दरोडेखोरी’ बनल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोणत्याही नियमांचे सोयरसुतक न ठेवता, चालकांचे ‘तोंड पाहून’ भरमसाठ ऑनलाईन दंड ठोकला जात असून, “पैसे आत्ताच्या आत्ता रोख भरा” असा धाक दाखवत सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे.
अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, दंड ऑनलाईन प्रणालीवर टाकलेला असतानाही कर्मचाऱ्यांची भूक भागत नाही. ऑनलाईन प्रणालीनुसार चालकाला दंड भरण्यासाठी वेळेची मुभा असते. मात्र, जामखेडात थेट दादागिरी करत वाहनधारकांच्या गाड्यांच्या चाव्या जबरदस्तीने काढून घेतल्या जात आहेत. हातातील कामे सोडून तासनतास रस्त्यावर ताटकळत राहावे लागत असल्याने नागरिक, शेतकरी आणि व्यापारी RTO च्या या अरेरावीमुळे पुरते हैराण झाले आहेत. नियम सांगणाऱ्या RTO च्या अधिकाऱ्यांना स्वतःच्याच नियमांचा विसर पडला आहे का? ऑनलाईन पावती फाडल्यानंतर जागेवर रोख रक्कम मागायचा आणि चाव्या हिसकावण्याचा अधिकार यांना कोणी दिला? असा संतप्त सवाल संपूर्ण शहरातून विचारला जात आहे. हा कारभार पाहता हे RTO चे पथक आहे की एखादी ‘वसुली गँग’, असा भयानक संशय आता नागरिक व्यक्त करत आहेत.
जामखेडमधील सामान्य जनता आणि वाहनधारक RTO च्या या मनमानी कारभाराला आता पुरते कंटाळले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वसुलीखोर आणि दडपशाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली नाही, तर जामखेडच्या रस्त्यावर RTO विरोधात तीव्र आणि आक्रमक जनआंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा नागरिकांनी दिला आहे.
“जामखेडच्या रस्त्यांवर RTO ची उघड गुंडगिरी सुरू आहे. ऑनलाईन दंड टाकून पुन्हा जागेवरच पैशांचा तगादा लावणे आणि दादागिरीने गाड्यांच्या चाव्या काढणे म्हणजे तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. ही प्रशासकीय लूट तात्काळ थांबली पाहिजे!” — संतापलेले वाहनधारक





