लंडन : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज ब्रिटन आणि आयर्लंडच्या ६ दिवसांच्या दौऱ्यासाठी लंडनमध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्या ते ब्रिटन आणि आयर्लंडबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक भक्कम करण्यावर भर देणार आहेत. या दोन्ही देशांबरोबरच्या भारताचे मैत्रीपूर्ण संबंधांचे नुतनीकरण करण्यासाठी आपला हा दौरा असल्याचे जयशंकर यांनी रवाना होण्यापुर्वी केलेल्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे. भागीदारीचे हे संबंध संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि अर्थकारण, आरोग्य, शिक्षण, नागरिकांमधील थेट संपर्क अशा विविध क्षेत्रांमध्ये विकसित झाले आहेत, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. मंगळवारी आणि बुधवारी जयशंकर ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी, अन्य काही मान्यवर आणि ब्रिटनमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी उच्चस्तरिय द्विपक्षीय संवाद साधणार आहेत. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बंदिस्त कत्क्षामध्ये होणाऱ्या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू हा दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार कराराशी संबंधित वाटाघाटी हा असणार आहे. याशिवाय परराष्ट्र धोरण आणि सुरक्षाविषयक मुद्यांवरही चर्चा होणार आहे. बुधवारी जयशंकर छाथाम हाऊस या थिंक टँकच्या सदस्यांशी वार्तालाप करणार आहेत. गुरुवारी डब्लिन येथे आयर्लंडचे परराष्ट्र मंत्री सिमोन हॅरिस यांची ते भेट घेणार आहेत आणि भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत.