कागदपत्रे 30 जूनपर्यंत वापरता येणार : लॉकडाऊनमुळे निर्णय
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील दैनंदिन सर्व व्यवहार ठप्प आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, लायसन्स, परमिट आदीचे नुतनीकरण करणे आवश्यक असणाऱ्या वाहनचालकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे नागरिकांना सद्य:स्थितीत ही कागदपत्रे 30 जूनपर्यंत वापरता येणार आहेत.
लॉकडाऊनमुळे देशभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज बंद आहे. शहरातीलही लायसन्सविषयक काम 18 मार्चपासूनच बंद आहे. केवळ नवीन वाहन नोंदणी आणि तपासणीचे काम सुरू आहे. या कालावधीत वाहनांचे परमिट, फिटनेस किंवा लायसन्सची मुदत संपणाऱ्या नागरिकांमध्ये लायसन्स प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेषत: मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन कायदा, 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, सर्व प्रकारचे परमिट, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी आदींना 30 जून 2020 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ज्या वाहनचालकांचे वाहन विषयक परवाने, परमिट, योग्यता प्रमाणपत्र आदी बाबी 1 फेब्रुवारी ते 30 जून या कालावधीत मुदत संपली असेल, ज्यांच्या कागदपत्रांची मुदत 30 जूनला संपणार असून, त्याचे नूतनीकरण करायचे होते. त्यांच्यासाठी ही मुदतवाढ लागू असणार आहे.
ज्या वाहनचालकांचे “लर्निंग’ लायसन्सचे नूतनीकरण बाकी आहे आणि ज्यांना नवीन लायसन्स काढायचे आहे, अशा वाहनचालकांच्या शासनाचा निर्णय अद्याप आलेला नाही. शासन निर्णय आल्यानंतर त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी सांगितले.