Pune : स्वाधारसाठी अंतिम मुदतवाढ

पुणे : विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र. सद्यस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेले, तसेच नव्याने या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे समाजकल्याण विभागाने स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवली आहे.
समाजकल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृहाच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत सॉफ्टवेअर विकसनाचे काम प्रगतिपथापर असून, त्यामध्ये ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचे मॉड्यूल कार्यरत झाले आहे. त्यानंतर स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत वेळोवेळी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली होती. तांत्रिक अडचणीमुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून समाजकल्याण आयुक्तांनी पुन्हा मुदत वाढविली आहे.
समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाइन अर्ज केला नाही, अशा विद्यार्थ्यांनी वरील पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. देण्यात आलेली मुदतवाढ अंतिम मुदतवाढ असून, यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याने अंतिम दिनांकापर्यंत अर्ज करतील, अशाच विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांत व्यावसायिक, अव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.





