पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सन 2030 पर्यंतचा विचार करून हरित सेतू प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची 184 उद्याने व विकासयोग्य अतिरिक्त हिरव्या जागा राखीव आहेत. हरित सेतू उपक्रमाद्वारे शहरातील हिरवी क्षेत्रे व उद्याने एकमेकांशी जोडून हिरव्या मोकळ्या जागांचे जाळे निर्माण करण्यात येईल. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी सूचना व संकल्पना 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत महापालिका प्रशासनाला पाठवायच्या आहेत.
नागरिकांच्या सहकार्यातून या प्रकल्पासाठी मास्टर प्लॅन तयार नागरिकांनी महापालिकेला पाठविलेल्या सूचना आणि नाविण्यपूर्ण संकल्पनांचे कार्यशाळेतील तज्ञांकडून मूल्यांकन केले जाणार आहे. तसेच उत्तम कल्पनांची अमंलबजावणी या प्रकल्पात केली जाणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ञ, शहरी नियोजन अधिकारी आणि डिझाइनर स्वंयसेवी संस्था यांच्या सहभागातून हरित सेतू उपक्रमाची मूलभूत रचना या कार्यशाळेत तयार करण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक साधनांचा प्रभावी वापर करून शहरभर विखुरलेल्या हरित क्षेत्रांना एकमेंकाना जोडल्यास शहराची पर्यावरणीय गुणवत्ता वाढून त्याचा लाभ शहरवासियांना होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून हरित क्षेत्र जोडणी विकास आराखडा महापालिकेने शहर विकासाच्या दृष्टीने तयार केला आहे. देशातील अशा प्रकारच्या आरखड्याची अंमलबजावणी करणारे पिंपरी चिंचवड शहर हे प्रथम शहर ठरणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर किंवा स्मार्ट सारथी ऍपवर सूचना व संकल्पना मांडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.