नवी दिल्ली – नोव्हेंबर महिन्यात भारताची निर्यात 19 टक्क्यांनी वाढून 38 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. या महिन्यात आयात एक टक्क्याने कमी होऊन 62 अब्ज डॉलर झाली आहे. त्यामुळे व्यापारातील तूट 24 अब्ज डॉलर इतकी मर्यादित झाली आहे. हा पाच महिन्याचा निचांंक आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये निर्यात वाढण्याऐवजी कमी झाली होती. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यामध्ये आयात कमी झाल्यामुळे तूट मर्यादित ठेवण्यात यश मिळाले आहे.या महिन्यात सोने, खनिज तेल, कोळसा इत्यादीची आयात कमी झाली आहे. सोन्याच्या किमती जास्त असल्यामुळे सोन्याची आयात कमी झाली असल्याचे दिसून येते. जून महिन्यात व्यापारातील तूट 18 अब्ज डॉलर होती. ऑक्टोबर महिन्यात ती वाढन 41 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेली होती. आता मात्र ही तूट कमी होत असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारताची निर्यात 2.62 अब्ज डॉलरने वाढून 292 अब्ज डॉलर झाली आहे. या कालावधीत भारताची आयात 5.59 टक्क्यांनी वाढून 515 अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे सरलेल्या आठ महिन्यात व्यापारातील तूट 223 अब्ज डॉलरवर गेली आहे. अशा परिस्थितीत भारताची पूर्ण वर्षाची व्यापारातील तूट 400 अब्ज डॉलरच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू खात्यावरील तूट वाढून भारताच्या रुपयाच्या मूल्यावर दबाव येत आहे. ऑक्टोबर महिन्यात भारताची निर्यात कमी झाली होती. ही तूट नोव्हेंबर महिन्यातील निर्यातीमुळे भरून निघण्यास मदत झाली असल्याचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले. तरीही अमेरिकेला निर्यात जास्त – अमेरिकेने भारतावर 50% आयात शुल्क 28 ऑगस्ट रोजी लावले होते. त्यामुळे ऑगस्टनंतर अमेरिकेला होणार्या निर्यातीवर परिणाम झाला असला तरी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारताची इतर देशापेक्षा अमेरिकेलात सर्वात जास्त निर्यात झाली असल्याचे निर्यातदारांच्या संघटनेचे अध्यक्ष एस सी रल्हन यांनी सांगितले. अमेरिकेशिवाय अरब अमिरात, नेदरलँड, चीन, ब्रिटन, जर्मनी, सिंगापूर, बांगलादेश, हाँगकाँग या देशांना भारताची निर्यात वाढली आहे.