नवी दिल्ली – जयपूर कंट्रोल रूमच्या व्हॉट्सॲप नंबरवर आलेल्या एका मेसेजने तीन राज्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जयपूर, दिल्लीतील संसद भवन-राष्ट्रपती भवन आणि अयोध्येतील राम मंदिरात येत्या ७ दिवसांत मोठे स्फोट होतील, असे या मेसेजमध्ये लिहिले होते.
हा मेसेज मिळाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी दिल्ली आणि यूपी पोलिसांना सतर्क केले असून तपास सुरू केला आहे. जयपूर पोलिसांनी नंबर ट्रॅक केला असता तो एका मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, या मुलीला असा मेसेज पाठवल्याचे विचारले असता तिने स्पष्ट नकार दिला आहे. पुढे तपास केला असता या मुलीचा मोबाइल कोणीतरी हॅक करून पोलिसांना मेसेज केल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासात मेसेज पाठवणारा व्यक्ती या तरुणीचा मित्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर जयपूर पोलिसांनी एटीएस-एसओजी दिल्ली पोलिस आणि यूपी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
गुरुवारी दुपारी ११ वाजता जयपूर कंट्रोल रूमच्या व्हॉट्सॲप नंबरवर हा मेसेज आला होता. यानंतर नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी प्रभारी अतिरिक्त डीसीपींना माहिती दिली. अतिरिक्त पोलिस आयुक्त कैलाश बिश्नोई यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मेसेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. ज्या नंबरवरून हा मेसेज आला तो भरतपूरचा रहिवासी होता. भरतपूर एसपींसोबत माहिती सामायिक केली. सर्व जिल्ह्यातील पोलीस, एटीएस-एसओजी यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.