पिंपरीतील अजमेरा कॉलनीतील ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट

  • कोणताही अनुचित घटना नाही

पिंपरी – वीस दिवसांपूर्वी इंद्रायणीनगरमधील ट्रान्स्फॉर्मरच्या स्फोटात तीन जणांनी जीव गमावल्यानंतरही महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरच्या स्फोटांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. पुन्हा एकदा पिंपरीतील अजमेरा कॉलनीतील ट्रान्स्फॉर्मरचा शुक्रवारी (दि. 25) स्फोट झाला. ही घटना दुपारी घडल्याने फारशी वर्दळ नसल्याने या अपघातात सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेनंतर या परिसराचा वीजपुरवठा तीन तास खंडित झाला होता.

अजमेरा कॉलनीत गणेशभक्‍त कै. महादेव गोविंद कदम प्रवेशद्वार येथे महावितरणचा ट्रान्स्फॉर्मर आहे. शुक्रवारी (दि.25) दुपारी साडे तीनच्या सुमारास या ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट होऊन आग लागली. या स्फोटानंतर ट्रान्स्फॉर्मरमधील उकळते तेल रस्त्यावर लांब अंतरावर उडून पडले. दुपारी याठिकाणी फारशी वर्दळ नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. ही घटना घडल्यानंतर महावितरणच्या अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तसेच सायंकाळी उशिरापर्यंत ट्रान्स्फॉर्मरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. तर बुशिंग फुटल्याने ही घटना घडल्याचे महावितरण प्रशासनाचे म्हणने आहे.

भोसरी इंद्रायणीनगरमधील ट्रान्स्फॉर्मरच्या स्फोटात एका चिमुकलीसह तिघांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर महावितरणने एका अभियंत्यासह तीन जणांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, याकरिता खबरदारी घेत असल्याचे महावितरण प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते.

मात्र, अजमेरा कॉलनीतील या ट्रान्स्फॉर्मरच्या स्फोटाने महावितरणचे पितळ पुन्हा उघडे पडले आहे. महावितरणच्या या बेजबाबदार कार्यपद्धतीबद्दल रहिवाशांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्‍त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.