जबलपूरमध्ये लष्कराच्या ऑर्डनन्स फॅक्ट्रीत स्फोट; 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, 10 हून अधिक जखमी

जबलपूर : जबलपूरच्या आयुध निर्माणी खमारियामध्ये (ओएफके) मंगळवारी सकाळी भीषण स्फोट झाला. 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. 10 हून अधिक जण भाजले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कारखाना व्यवस्थापनाने घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. कारखान्याच्या एफ-6 विभागातील इमारत क्रमांक 200 मध्ये हा स्फोट झाला. स्फोटानंतर एक कर्मचारी बेपत्ता होता, त्याचा मृतदेह सापडला आहे. त्याचवेळी अन्य एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कॅन्ट विधानसभेचे आमदार अशोक रोहानी जखमींना पाहण्यासाठी खमरिया येथील रुग्णालयात पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या एफ-6 विभागात बॉम्ब भरण्याचे काम सुरू होते. यावेळी हायड्रोलिक सिस्टीममध्ये अचानक स्फोट झाला. घटनेनंतर जखमी कर्मचाऱ्यांना ओएफके रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने कर्मचारी रणधीर, श्यामलाल आणि चंदन यांना खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. हा स्फोट कसा झाला आणि कोणाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
भूकंप झाल्यासारखे वाटले
स्फोटानंतर ओएफकेला लागून असलेल्या सुमारे 5 किलोमीटर परिसरात भूकंप झाल्यासारखे वाटले. लोक घराबाहेर पडले. मानेगाव, चंपानगर, नानक नगर येथे राहणाऱ्या लोकांनाही स्फोटाचा आवाज ऐकू आला. मानेगाव येथे राहणारे मनोज थरेजा यांनी सांगितले की, सुरुवातीला भूकंप झाल्यासारखे वाटत होते, त्यानंतर कारखान्यात स्फोट झाल्याचे समोर आले.





