Understanding Digital Arrest: सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार शोधले जात आहेत. गेल्याकाही दिवसांपासून ‘डिजिटल अरेस्ट’च्या (Digital Arrest Scam) माध्यमातून नागरिकांना लाखो रुपयांना गंडवले जात आहे. असाच काहीसा प्रकार ठाणे येथील एका व्यक्तीसोबत घडला आहे. ठाणे येथील व्यक्तीला तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाल्याची धमकी देत हजारो रुपयांना फसवल्याची घटना समोर आली होती. हा डिजिटल अरेस्ट नेमका काय प्रकार आहे व याद्वारे तुमची कशाप्रकारे फसवणूक केली जाऊ शकते? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय? डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) हा एकप्रकारे ऑनलाइन ब्लॅकमेलिंगचा नवीन प्रकार आहे. डिजिटल अरेस्टचा सोपा अर्थ तुम्हाला ऑनलाइन धमकी देऊन व्हीडिओ कॉलिंगच्या माध्यमातून तुमच्यावर लक्ष ठेवणे. प्रामुख्याने शिक्षित व शहरी भागातील नागरिक या प्रकारच्या फसवणुकीस बळी पडत असल्याचे समोर आले आहे. डिजिटल अरेस्ट दरम्यान गुन्हेगार हे स्वतः मोठे अधिकारी असल्याचे भासवतात. पोलिस अथवा उच्च पदावरील अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांची फसवणूक केली जाते. यादरम्यान, गुन्हेगार नागरिकांना घराबाहेर पडण्यास व इतरांशी संपर्क साधण्यास बंदी घालतात. याकाळात गुन्हेगार व्हॉट्सअॅप व्हीडिओ कॉलिंगच्या माध्यमातून सातत्याने संपर्कात राहतात. गुन्हेगार सातत्याने संपर्कात असल्याने पीडित व्यक्तीला कोणतीही इतर कृती करता येत नाही. ते ऑनलाइनच्या माध्यमातून घरातच कैद होतात. सायबर गुन्हेगार (Cyber Crime) नागरिकांना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची अथवा कुटुंबातील एखाद्या सदस्याने चुकीचे कृत्य केले असून त्यांना अटक केल्याची खोटी माहिती सांगतात. ड्रग्स, मनी लाँड्रिग व बेकायदेशीर व्यवसायाच्या नावाखाली घाबरवले जाते. तसेच, गुन्हा मागे घेण्यासाठी व्यक्तींकडून पैशांची मागणी केली जाते व अनेकजण घाबरून पैसे देखील देतात. गुन्हेगारांकडून पीडित व्यक्तीला मानसिक व शारीरिकरित्या त्रास दिला जातो. डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून फसवणूक टाळण्यासाठी काय करावे? पोलिस व CERT-In कडून सातत्याने नागरिकांना अशाप्रकारच्या फसवणुकीपासून सावध केले जात आहे. वेळोवेळी याबाबत मार्गदर्शक सूचना देखील जारी केली जाते. अशाप्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्याचे एकमेव माध्यम म्हणजे माहितीची खात्री करून घेणे. बहुतांश प्रकरणात गुन्हा दाखल करणे व अटक करण्याची भिती दाखवत फसवणूक केली जाते. मात्र, अशावेळी घाबरून जाऊ नये. तुम्ही जर कोणताही गुन्हा केला नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. तसेच, घाबरून वैयक्तिक व बँकेशी संबंधित कोणतीही माहिती गुन्हेगारांना देऊ नये. यूपीआय आयडी, बँक खाते क्रमांक व ओटीपी सांगितल्यास तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढून घेतले जाऊ शकतात. याशिवाय, कोणत्याही ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःला वाचवायचे असल्याने बनावट अॅप्स डाउनलोड करणे टाळावे. अनोळखी क्रमांकावरून आलेले कॉल उचलू नये. मेसेज अथवा ईमेलच्या माध्यमातून आलेल्या लिंक्सवर क्लिक करणे टाळावे. महत्त्वाचे म्हणजे तुमच्या नकळत बँक खात्यातून पैसे वजा झाल्यास याबाबत त्वरित बँकेला माहिती देऊन पोलिसात तक्रार दाखल करावी. यामुळे पैसे परत मिळण्यास मदत होऊ शकते.