मुंबईतील रूग्णसंख्या जास्त असण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

मुंबई – मुंबईत दररोज साठ हजारपेक्षा जास्त करोना टेस्ट होत आहेत. असे असले तरी मुंबईत याहून अधिक रुग्णसंख्या असू शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या मेडिकलमध्ये करोना टेस्ट किट सहज उपलब्ध झाले आहे.
हे किट वापरून कोणीही घरच्या घरी करोना टेस्ट करू शकतात. तसेच ओमायक्रॉनची कुठलीही लक्षणे नसलेली व्यक्ती करोना टेस्ट करत नाही. त्यामुळे मुंबईत करोना रुग्णांची संख्या ही जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शनिवारच्या तुलनेत मुंबईत रविवारी रुग्णसंख्या घटली आहे. मुंबईत सामान्य नागरिक कोविड कीट वापरून टेस्ट करत आहेत. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या किती आहे हे सांगणे कठीण असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिली आहे.
म्हणून करोना दुपटीचे प्रमाण, करोना रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण, ऑक्सिजची गरज, व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची गरज यावर लक्ष ठेवून असल्याचे जोशी यांनी नमूद केले. करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळेही रुग्ण वाढले असतील असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.




