प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – संपूर्ण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबतची अनिश्चितता दिवसेंदिवस वाढत आहे. निवडणुका लागण्याच्या आशेवर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर खर्च करणारे आणि जनसंपर्क मोहीम राबवणारे इच्छुक आता गंभीर अडचणीत सापडले आहेत. निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यतेवरील चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांचा जीव टांगणीला लागला असून त्यांच्या मनात आता काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.निवडणूक जाहीर होतील, या विश्वासावर इच्छुक उमेदवारांनी लाखो-कोट्यवधी रुपये खर्च केले. मतदारांमध्ये आपले अस्तित्व दिसावे म्हणून अनेकांनी देशदर्शन सहली, महाआयोजन, महिलांसाठी पैठणी वितरण, लकी ड्रॉ, देवदर्शन सहली, गावभेट दौरे, दिवाळी भेटवस्तू वाटप अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. अक्कलकोट स्वामी समर्थ, महालक्ष्मी कोल्हापूर, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर अशा ठिकाणांच्या देवदर्शन सहलींमध्ये महिलांची मोठी संख्या सहभागी झाली. या सर्व कार्यक्रमांमध्ये इच्छुक उमेदवारांनी चांगलाच खर्च केला आहे. अनेकांनी आपल्या प्रचार यंत्रणेचा विस्तार, कार्यकर्त्यांचे मानधन, वाहनव्यवस्था, सोशल मीडिया मोहीम अशा गोष्टींवरही मोठी गुंतवणूक केली. या सर्व खर्चामुळे अनेकांच्या बँक खाते रिकामे झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २७ टक्के ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणी अजूनही प्रलंबितच आहे, त्यामुळे निवडणूका पुढे ढकलल्या जातील का, अशा चर्चा मतदार आणि जनसामान्यामध्ये सुरू आहेत. राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांत राजकीय हालचाली वेगाने सुरू होत्या. कुसवली, आंबी, सायंत्रे, परांडे, शिरगाव, किवळेया गावांसह संपूर्ण मावळ परिसरातील इच्छुकांनी मतदारांच्या भेटीगाठी वाढवल्या होत्या. विविध गावांत आयोजित महाप्रसाद, महिला मेळावे, शिवजयंती/दिवाळी भेटवस्तू कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा अशा उपक्रमांत इच्छुकांची उपस्थिती ठळकपणे जाणवत होती. मात्र निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर अनेक इच्छुकांनी आधीच खूप खर्च झाला असल्याने प्रचार रणांगणातून माघार घेण्याचाही निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. वाढत्या चर्चांमुळे इच्छुकांचा जीव टांगणीला निवडणुका लागतील या विश्वासावर आधीच मोठा खर्च झाला आहे. आता निवडणुका पुढे गेल्यास आणखी खर्च कसा करायचा या द्विधा मनःस्थितीत इच्छुक अडकले आहेत. परिसरातील जिल्हा परिषद आधी पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने तयार झालेल्या राजकीय हालचाली काहीशा मंदावल्या आहेत. त्यामुळे निवडणुका कधी लागतील, निवडणूक आयोगाचा कार्यक्रम कधी जाहीर होईल, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान वडगाव मावळ परिसरातील राजकीय वातावरण मात्र पूर्णपणे निवडणूक मोडमध्येच अडकून पडले आहे.