Basangouda Patil Yatnal | कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी राज्यात नव्या ‘हिंदूत्ववादी पक्ष’ स्थापन करणार असल्याचे संकेत दिले आहेत. भाजपने त्यांना पक्षातून निलंबित केल्यानंतर यत्नाळ यांनी याबाबत संकेत दिले आहेत. यत्नाळ यांनी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि त्यांचे सुपुत्र खासदार विजयेंद्र येडियुरप्पा यांच्याविरोधात घराणेशाहीची टीका केली. या टीकेनंतर बसनगौडा पाटील यत्नाळ यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. भाजपने बी. वाय. विजयेंद्र यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवले आणि बी. एस. येडियुरप्पा यांच्या ‘घराणेशाही’ला पाठिंबा दिला, तर ते एक नवीन राजकीय पक्ष स्थापन करतील, असे यत्नाळ यांनी म्हटले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ते भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाहीत. भाजपा मला आईसमान आहे, पण कर्नाटक भाजप आता हिंदूंचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरली आहे. यत्नाळ यांनी दावा केला की, राज्यभरातील हिंदू कार्यकर्त्यांचे त्यांना संदेश येत आहेत की एक नवीन हिंदूवादी पक्ष स्थापन केला जावा. जर भाजपा नेतृत्वाने विजयेंद्र यांना पुढील वेळीही प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून कायम ठेवले, तर राज्यातील जनता एक ऐतिहासिक निर्णय घेईल, असा इशारा त्यांनी दिला. भाजपने यत्नाळ यांना पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. मात्र, यत्नाळ यांनी प्रश्न विचारला की, त्यांचा गुन्हा काय होता? ते म्हणाले, “मी ना भाजपच्या उमेदवाराविरोधात मतदान केले, ना काँग्रेस किंवा जेडीएसच्या बैठकांना उपस्थित राहिलो, मग मला का काढले?” यतनाल यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे घराणेशाही आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. येडियुरप्पांमुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली असून, विजयेंद्र यांना हटवले नाही, तर भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागेल, असा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, ते आणि त्यांचे सहकारी राज्यात एका नवीन राजकीय पर्यायाची गरज आहे यावर जनमत संग्रह करतील. लोकांनी नवीन पक्षासाठी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली असल्याचा दावा त्यांनी केला. जनतेने पाठिंबा दिला तर यावर्षी विजयादशमीला 100% एक नवीन राजकीय पक्ष अस्तित्वात येईल.