Pune : वाचन पंधरवड्यानिमित्त दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये १ ते १५ जानेवारी या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम राबविला जाणार आहे. याअंतर्गत शासकीय विभागीय ग्रंथालयात दुर्मिळ व नामांकित ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
वाचन संस्कृतीच्या विकासाने मानवाच्या व्यक्तिमत्वाचे भरण पोषण होण्यास, तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते; परंतु अलिकडच्या काळात देशाचा तरुण वाचक वाचन संस्कृतीपासून दुरावत चालला असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथवाचनाकडे आकर्षित करण्यासाठी ʺवाचन संकल्प महाराष्ट्राचाʺ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, पुणे जिल्हा मराठी भाषा समिती रामहरी भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ग्रंथपाल गट-अ सुरेश रिद्दीवाडे. नूतन मराठी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्रीरंग भिसे, सहाय्यक शिक्षक अमोल साळवी आदी उपस्थित होते.
मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे माणसाच्या आयुष्याला प्रेरणादायी व दिशादर्शक ठरते. ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या प्रभावात वाचन संस्कृती टिकविण्यासाठी वाचनालयांचे मोठे योगदान आहे. दुर्मिळ ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्र यांचे डिजिटायझेशन करून ही अमूल्य संपदा वाचकांसाठी उपलब्ध करावी, असे रामहरी भोसले यांनी सांगितले. वाचनामुळे अनुभवविश्व विस्तारते. एकाच जीवनामध्ये अनेक आयुष्य जगण्याचा आनंद पुस्तक वाचनामुळे मिळतो, असे सुरेश रिद्दीवाडे यांनी सांगितले आहे.





