मुंबई – करोनाव्हायरसमुळे पसरलेल्या कोव्हिड19 च्या महामारीच्या काळात, मुंबईमधील ज्या हॉटेल्सनी आपल्या हॉटेल्स्मधील खोल्या किंवा पूर्ण हॉटेल करोना-बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या “करोना योद्ध्यां’साठी उपलबध करुन दिले, अशा हॉटेल्सचा मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स) माफ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. ही रक्कम 22 कोटी 70 लाख रुपयांची आहे. अशा हॉटेल्सची संख्या 182 असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी जाहीर केले आहे.
मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या. त्यामुळे महाविद्यालये, शाळा, सभागृह आदी ठिकाणी कोविड सेंटर तयार करण्यात आले. या काळात वैद्यकीय व इतर कर्मचारी, रुग्णांच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यासाठी महापालिकेने काही हॉटेलच्या जागा ताब्यात घेतल्या होत्या. अशा हॉटेल मालकांनी तब्बल पाच हजार खोल्या कोविड योद्ध्यांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या.
या हॉटेल्सने संशयित रुग्णांनादेखील सवलतीच्या दरामध्ये खोल्या उपलब्ध करून दिल्या होत्या. अशा तारांकित, बिगर तारांकित हॉटेलच्या मालमत्ता करात सवलत देण्याचे निश्चित केले आहे.