ऑस्प्रे लष्करी एअरक्राफ्टची खास वैशिष्ट्ये, त्याच्या निर्मितीमागील इतिहास, आजवर झालेल्या अपघातांची एकूण संख्या आणि विमानाबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया.
अमेरिकेचे ऑस्प्रे लष्करी विमान डिसेंबर महिन्यात जपानमध्ये याकुशिमा बेटाजवळ झालेल्या अपघातामुळे चर्चेत होते. परंतु, या एअरक्राफ्टच्या अपघातांचा इतिहास पाहिला तर 2007 दरम्यान अमेरिकन सैन्याने (हवाई दल) याचा वापर सुरू केल्यापासूनच अनेक ऑस्प्रे क्रॅश झाले असल्याचे दिसून येते. हे विमान कितपत सुरक्षित आहे, हा एक चर्चेचा विषय आहे.
ऑस्प्रे (व्ही-22) हे अमेरिकन लष्कराचे पहिले टिल्ट-रोटर एअरक्राफ्ट आहे. ऑस्प्रे हे हेलिकॉप्टर व लष्करी विमानाची वैशिष्ट्ये असलेले हायब्रीड विमान आहे. महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे हायब्रीड असल्याने हे एअरक्राफ्ट एका हेलिकॉप्टर सारखे टेक-ऑफ करू शकते, फिरू शकते आणि लँड करू शकते व स्थिर पंख असलेल्या विमानाप्रमाणेसुद्धा उडू शकते. विमानाचे नेसेल्स (विमानाच्या पंखांवरील इंजिन असलेला भाग) वळवल्यानंतर ते इतर विमानांच्या तुलनेत अफाट वेगाने पुढे जाते.
संरक्षण तज्ज्ञांच्या भाषेत सांगायचे तर, ऑस्प्रे हे ड्युअल पायलट, मल्टी-इंजिन, व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग टिल्ट-रोटर विमान आहे. या टिल्ट-रोटर एअरक्राफ्ट्सचा वापर लष्करी जमीन तळांवरून व नेव्हीच्या जहाजातून सैनिक, उपकरणे तसेच लष्करी सामानाचा पुरवठा युद्धभूमीवर करण्यासाठी केला जातो. विमानाचे पंख आणि रोटर्स फिरवून आडवे दुमडले जातात.
यामुळे ऑस्प्रे विमान सहजपणे युद्धनौकेतून एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येते. ऑस्प्रे (व्ही-22) दोन रोल्स रॉयस टी- 406 एडी 400 टर्बो-शाफ्ट इंजिनच्या साहाय्याने चालते. विमानात 10 हजार पाउंड भार वाहून नेण्याची क्षमता आहे. एअरक्राफ्टची जास्तीत जास्त वेग मर्यादा 270 नॉट्स, म्हणजेच, अंदाजे 500 किलोमीटर प्रति तास. या टिल्ट-रोटर एअरक्राफ्टमध्ये 24 लोक बसू शकतात.
या विमानाची गरज का भासली?
इराण-इराक युद्धादरम्यान ऑपरेशन ईगल क्लॉ (1980) अयशस्वी ठरले. ऑपरेशनचे एक उद्दिष्ट तेहरानमध्ये बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या 52 अमेरिकन नागरिकांची (दूतावासातील कर्मचार्यांची) सुटका करणे होते. या अपयशात अमेरिकन मिलिटरी वापरत असलेल्या असक्षम हेलिकॉप्टर्सचा मोठा हात होता. ऑपरेशन ईगल क्लॉ दरम्यान पर्शियन आखात युद्धनौका यूएसएस निमित्झ थांबवण्यात आली होती. यामधून तेहरानमध्ये सैन्यबळ पोचविण्याकरिता व रेस्क्यू ऑपरेशन चालविण्यासाठी अमेरिकन नौदल आर.एच. 53 डी हेलिकॉप्टरचा वापर करत होते. हेलिकॉप्टरच्या क्षमतेमुळे हे अंतर इंधन भरण्यासाठी न थांबता पूर्ण करता येत नसे.
इंधन भरण्यासाठी नौदलाला इराणच्या वाळवंटात छोटेसे हवाई क्षेत्र निर्माण करून तेथे हेलिकॉप्टर लॅन्ड करून इंधन भरावे लागत होते. इंधन टाकी ई.सी.-130 या विमानात असे व हेलिकॉप्टर जवळच लॅन्ड करून एअर फ्युएल (इंधन) भरताना अनेक अपघात झाले. यामध्ये ई.सी.-130, आर.एच. 53 डी हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले. तसेच, बचावकार्य करणार्या लष्करी जवानांचे देखील मृत्यू झाले. नुकसानामुळे ऑपरेशन ईगल क्लॉ रद्द करण्यात आले. पुढील वर्षी, म्हणजेच 1981 दरम्यान, पेंटागॉन आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सने एक हायब्रीड विमान विकसित करण्याची तयारी सुरू केली.
या प्रकल्पाला जॉइंट-सर्व्हिस व्हर्टिकल टेक-ऑफ/लँडिंग प्रोजेक्ट असे नाव दिले गेले. लांब पल्ल्याचे, कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर उडू शकणारे, व्हर्टिकल टेकऑफ (उड्डाण) करू शकणारे व हेलिकॉप्टरपेक्षा अनेक पट जास्त गतीने उडणारे लष्करी विमान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तज्ज्ञांचा असा विश्वास होता की अशा लांब पल्ल्याच्या विमानांमुळे बचाव कार्य करणार्या सैन्याला वारंवार इंधन भरण्याकरिता न थांबता अनेक मैलाचे अंतर गाठता येईल.
बेल टेक्सट्रॉन आणि बोईंग डिफेन्स, स्पेस अँड सिक्युरिटी यांनी सैन्याच्या गरजा समजून घेऊन मोठ्या पेलोड वाहण्याची क्षमता असलेले एक हायब्रीड एअरक्राफ्ट विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार दोन्ही कंपन्यांना 1983 मध्ये व्ही-22 विमाने विकसित करण्याचे कंत्राट देण्यात आले. डिझाइनमधील किरकोळ बदल आणि अनेक वर्षांच्या चाचणीनंतर, 2007 मध्ये युनायटेड स्टेट्स मरीन कॉर्प्सला ऑस्प्रे विमानाचा पहिला ताफा मिळाला. व्ही-22 ऑस्प्रे विमानाचे तीन प्रकारचे मॉडेल वापरात आहेत, पहिले एम.व्ही.-22 बी, दुसरे सी.व्ही.-22 बी आणि तिसरे सी.एम.व्ही.-22 बी.
एका अंदाजानुसार, सध्या अमेरिकन एअरफोर्स (स्पेशल ऑपरेशन्स कमांड), यूएस नेव्ही व मरीन कॉर्प्सची आकडेवारी मिळून साधारण 500 व्ही-22 विमाने वापरली जात आहेत. या व्यतिरिक्त, जपानी लष्कराला देखील काही एअरक्राफ्ट वापरायला दिली गेली आहेत. लिबिया, अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अमेरिकेच्या लष्करी कारवायांमध्ये ऑस्प्रे विमानांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनमधून अमेरिकन मुत्सद्दींना (डिप्लोमॅट्स) बाहेर काढण्यासाठी ऑस्प्रे (सी.व्ही.-22 बी) वापरण्यात आले असल्याचे काही अहवाल दर्शवितात. स्पेशल ऑपरेशन्स व युद्धाशिवाय, टिल्ट्रोटर विमानाचा वापर अनेकदा चक्रीवादळ आणि भूकंपानंतर मदत कार्यात केला जातो.
सतत होणार्या अपघातांमुळे ऑस्प्रे एअरक्राफ्टला फ्लाइंग कॉफिन हे टोपणनाव मिळाले आहे. फ्लाइट सेफ्टी फाउंडेशनने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2007 पासून ऑस्प्रे विमानांचे 40 अपघात झाले. यात एकूण 30 पेक्षा जास्त प्रवाशांचे बळी गेलेत. याशिवाय, साल 1991 ते 2006 दरम्यान विमानाच्या विविध चाचण्यांदरम्यान चार भीषण दुर्घटना घडल्या आणि 30 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत ऑस्प्रेने एकूण 60 हून अधिक सैनिकांचे जीव घेतले आहेत. अपघातांबाबतीत अमेरिकेकडील काही लष्करी एअरक्राफ्टसचे रेकॉर्ड ऑस्प्रेपेक्षा खराब आहे. पण ऑस्प्रेची किंमत 84 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. जवळजवळ प्रत्येक अपघातात विमानाचा चक्काचूर झाल्याने ऑस्प्रेमुळे होणारे आर्थिक नुकसान देखील मोठे.