जळगाव : लोकसभा निवडणुकींपासून गाजत असलेला एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश अद्यापही झालेला नाही. खडसे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिल्लीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती. तेंव्हापासून त्यांचा पक्षप्रवेश प्रलंबित आहे. खडसेंनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वाढदिवशी (2 सप्टेंबर) मी काही दिवस आणखी भाजपची वाट पाहिल नाही तर माझा मुळ पक्ष राष्ट्रवादी आहे तो जॉईन करुन मी राष्ट्रवादीमध्ये पुन्हा उत्साहाने काम करीन, असे सांगितले होते. त्यानंतर आता त्यांनी भाजप प्रवेश कुणामुळे रखडला हे जाहीर केले आहे. खडसे यांनी यावेळी भाजपाच्या 2 बड्या नेत्यांची थेट नावे घेतल्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगाव जिल्ह्यातले बडे भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यामुळे आपला भाजपा प्रवेश रखडला असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. खडसे भाजपामध्ये असतानाही हे दोन नेते त्यांचे विरोधक मानले जात असत. भाजप पक्ष प्रवेशाची मी स्वतःहून विनंती केली नव्हती तर भाजपच्याच दिल्लीमधील सर्वोच्च नेत्यांच्या आमंत्रणावरून भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. पाच महिन्यापासून मी भाजप पक्षप्रवेशाची वाट पाहत असून पाच महिन्यात मला प्रवेश मिळू शकत नसेल तर मी राष्ट्रवादीत गेलो तर काय बिघडतं ?, असा सवाल खडसे यांनी विचारला आहे. भाजपला मोठा करण्यात गेल्या 40 वर्षापासून माझं मोठे योगदान मात्र मेहनत घेणाऱ्यांना बाजूला टाकलं जातं. नवख्यांना मोठं केलं जातं हा कुठला न्याय? असा प्रश्नही त्यांनी विचारला. त्याचवेळी भाजपालाच माझी गरज नाही तर मी भाजपामध्ये का जाऊ असंही त्यांनी यावेळी म्हंटलं.