पिंपरी – पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील टॉयलेटच्या भांड्यात स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 18) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी सुधीर तुकाराम शिर्के (वय 33, रा. ओटास्किम, निगडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये अर्भक फेकून दिले. फिर्यादी शिर्के यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्या वेळी अर्भक मृतावस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.