जोडून सुट्टी आल्याने खरेदीसाठी झुंबड
फूल बाजारातही तेजी
पुणे – गणेशचतुर्थीच्या आधी सलग दोन दिवस जोडून सुट्टी आल्याने खरेदीसाठी बाजारपेठा अक्षरश: फुलल्या आहेत. उत्सवाच्या सजावटीच्या खरेदीपासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सर्वच गोष्टींची रेलचेल बाजारपेठेमध्ये दिसून येत आहे.
सोमवारी गणरायांचे आगमन होणार असल्याने त्याच्या तयारीची लगबग घरोघरी सुरू झाली आहे. तत्पूर्वी रविवारी हरतालिका असल्याने त्यासाठी लागणाऱ्या हरतालिकेच्या मूर्ती आणि दुर्वा, आगाडा, वाळू यासह सर्व पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या आरासाच्या खरेदीसाठी अगदी ग्रामीण भागातूनही अनेकांनी हजेरी लावली आहे.
गणेश मूर्ती, मखरे, रंगीत वस्त्रे, लोलक, मोरपीस, आसन, दुर्वा, आगाडा, केवडा, अत्तर फाया, पाच फळे, पान, उदबत्त्या, नारळ याशिवाय पूजेसाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू बाजारात विक्रेत्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
याशिवाय नैवेद्यासाठी लागणारे पंचखाद्य, खव्याचे मोदक हे तर आहेच परंतु हल्ली मिळणारे चॉकलेट मोदक आणि त्यासह अनेकविध प्रकारही मिठाई -वाल्यांनी उपलब्ध करून दिले आहेत.
गौरी आगमनाचीही तयारी…
गणपतींनंतर गुरूवारी गौरींचेही आगमन होत असल्याने गौरींचे मुखवटे, वस्त्र, हात, अढणी, दागिने, साड्या या गोष्टीदेखील बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्या सजावटीची बात काही औरच असते. गौरींसमोर ठेवल्या जाणाऱ्या वस्तू, खेळण्या यांशिवाय मिठाईची रेलचेलही उत्सवात गोडवा आणत आहे.
फुलांचा बाजार या दिवसात तेजीतच असतो. उत्सवाच्या सजावटीसाठी लागणारी झेंडू, शेवंती, निशीगंध, कमळ ही पारंपरिक फुले तर आहेतच; परंतु जरबेरा, विलायती गुलाब आणि अन्य फुलांचीही आवक बाजारपेठेत दिसून येत आहे.