प्रभात वृत्तसेवा मंचर – कळंब (ता.आंबेगाव) येथील गणेशवाडी परिसरात शनिवार, दि.२९ रोजी सकाळी बिबट्याचा मादी बछडा मृत अवस्थेत आढळल्याने गावात खळबळ उडाली. वनविभागाने पंचनामा केला आहे.शेतकरी अनिता रमेश भालेराव या सकाळी सुमारे १०.४५ वाजता उसाची मोटार बंद करण्यासाठी गेल्या असता उसाच्या वाफ्यात सुमारे तीन ते चार महिन्यांची बिबट मादी बछडी मृत पडलेली दिसली. अचानक समोर आलेल्या या दृश्याने त्या घाबरल्या आणि तत्काळ गावकऱ्यांना तसेच वनविभागाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक संपत तांदळे, वनसेवक एकनाथ ढोंगे, आनंद वळसे पाटील यांसह गावडेवाडी बेस कॅम्पची टीम नितीन भालेराव, प्रमोद पिंगळे, शंतनू भालेराव, रमेश भालेराव आणि संजय भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.