नवी दिल्ली – ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्टमध्ये उद्या, सोमवारपासून जागतिक दुग्ध व्यवसाय शिखर परिषद 2022 होणार आहे. या शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 12 ते 15 सप्टेंबर या कालावधीत चार दिवस ही जागतिक दुग्ध व्यवसाय शिखर परिषद होणार आहे. जगभरातील आणि भारतातील दुग्ध व्यवसायाशी संबंधित हितधारकांचे हे एक संमेलनच असणार आहे. यामध्ये उद्योजक, तज्ज्ञ शेतकरी आणि धोरणकर्ते हे सहभागी होणार आहेत.
“पोषण आणि उपजीविकेसाठी दुग्धव्यवसाय’ ही या परिषदेची संकल्पना आहे. या शिखर परिषदेत 50 देशांतील सुमारे 1 हजार 500 जण सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारची शेवटची शिखर परिषद सुमारे पन्नास वर्षांपूर्वी 1974मध्ये भारतात झाली होती. त्यानंतर प्रथमच अशा प्रकारची जागतिक दुग्ध व्यवसाय शिखर परिषद होत आहे. यामध्ये तज्ज्ञ शेतकरी, उद्योजकही सहभागी होणार आहेत.
भारताचा 23 टक्के वाटा –
भारतीय दुग्धव्यवसाय हा छोट्या आणि अल्पभूधारक दूध उत्पादक शेतकऱ्यांना, विशेषतः महिलांना सक्षम बनवणाऱ्या सहकार मॉडेलवर आधारित आहे. परिणामी गेल्या आठ वर्षांत दूध उत्पादनात 44 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. जागतिक दूध उत्पादनात भारताचा सुमारे 23 टक्के वाटा आहे. दरवर्षी सुमारे 210 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन होते. 8 कोटी पेक्षा जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम बनवणाऱ्या भारतीय दूध उद्योगाची यशोगाथा जागतिक दुग्धव्यवसाय शिखर परिषद 2022 मध्ये सर्वांसमोर सादर केली जाणार आहे.