पिंपळे गुरव -जुनी सांगवी परिसरात एकच रस्ता आणि एकच काम वारंवार केले जात असून नागरिकांनी कराच्या स्वरूपात भरलेल्या पैशांची उधळपट्टी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन करते तरी काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जुनी सांगवी ते तलाठी कार्यालय गावठाण परिसर तसेच मारुती मंदिर परिसरात पहिले काळे ब्लॉक नंतर पिवळे व त्यानंतर रस्ता डांबरीकरण केले. आता पुन्हा ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुन्हा, पुन्हा तेच काम केले जात आहे. सर्वसामान्यांच्या करातील पैशांची अशा पद्धतीने उधळपट्टी केली जात आहे. सांगवी परिसरात विकास कामांच्या नावाखाली वारंवार तोडफोड केला जात आहे. तसेच सुशोभिकरण करत असताना एकाच वेळी नियोजनबद्ध पद्धतीने कामे होताना दिसत नाही. सांगवी परिसरातील काही भागातील रस्ते भव्य व सुंदर झालेले आहेत. परंतु, जुनी सांगवीतील गावठाण परिसरात मारुती मंदिर, तलाठी कार्यालय या ठिकाणी रस्ता हा वारंवार खोदण्यात आला असून त्याची धूळ उडत आहे. धूळ नाकातोंडात जाऊन श्वासनाच्या आजार होतात. तसेच ती रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या डोळ्यात जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार रस्ते खोदाई का केली जाते? नियोजनबद्ध कामे का होत नाहीत? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पुन्हा, पुन्हा तेच काम जुनी सांगवी ते तलाठी कार्यालय, गावठाण परिसर तसेच मारुती मंदिर परिसरात पहिले काळे ब्लॉक नंतर पिवळे व त्यानंतर रस्ता डांबरीकरण केले. आता पुन्हा ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुन्हा, पुन्हा तेच काम केले जात आहे. सर्वसामान्यांच्या करातून अशा पद्धतीने उधळपट्टी केली जात आहे. महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांशी चौकशी करून पुढील कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जनतेच्या कररूपी पैशाचा दुरुपयोग होतो. वारंवार केला जाणारा हा खर्च पालिका कोणाच्या खिशाला भर देते, असा प्रश्न उपस्थित होतो. – राजू सावळे, शहर उपाध्यक्ष, मनसे. कॉंक्रिटीकरण थांबविले आहे. सध्या जे ब्लॉक आहेत तेच बसविण्यात येणार आहेत. पहिले अधिकारी होते त्यांनी हे केले मला याची जास्त काही माहिती नाही. – जयकुमार गुजर, स्थापत्य विभाग, महापालिका. पालिका प्रशासनाचा मनमानी कारभार येथे कधीही ड्रेनेज चोकअप नाही, रस्त्याची अडचण नाही तरीही रस्त्याचे यापूर्वी तीन वेळा ब्लॉक बदले आहेत. पांढरे, पिवळे-लाल, ग्रे आणि आता कॉंक्रिटीकरण सुरू आहे. हा रस्ता कॉंक्रिटचा करताना ड्रेनेज लाईन टाकणे त्यांनतर दोन्ही बाजूला पाण्याची लाइन, महावितरणची केबल अशा पद्धतीने महापालिकेचा मनमानी कारभार सुरू आहे.