कपिल पाटलांच्या अडचणीत वाढ ! पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे : भाडेकरारनाम्याचा बनावट दस्तावेज करून त्या माध्यमातून रेस्टॉरंट हॉटेल सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय परवानग्या मिळवून मूळ मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पुतण्या सुमित पाटील यांच्यासह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी पोलिसांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल असतानाच आता फसवणूक प्रकरणी त्यांचा पुतण्या सुमित पाटील याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने कपिल पाटील यांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
सुमित पाटील, सुरेंद्र पाटील व देवेंद्र पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनीही आपसात संगणमत करून व्यावसायिक अक्षय जैन यांच्या धामणकर नाका येथे असलेल्या जागेवर कब्जा केला होता. या नोटरीवरून भाडे कारारनाम्याचा बनावट दस्तावेज तयार करून अक्षय जैन यांच्या मालमत्तेच्या पत्त्यावर जीएसटी परवाना, फूड लायसन्स मिळवून तिघा आरोपींनी आपसात संगनमत करून अक्षय जैन यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी जैन यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार करीत आहेत.





