पिंपरी | एक्स गर्लफ्रेंडच्या गळ्यावर वार; तरुणाला अटक

पिंपरी, (प्रतिनिधी) – दीड वर्षांपूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर तरुणाने तरुणीला आडबाजूला नेऊन तिच्या गळ्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करत तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. आसिफ मोहम्मद शेख (वय 24, रा. किवळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी जखमी 19 वर्षीय तरुणीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणीने आरोपी शेख याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध मागील दीड वर्षांपूर्वी पूर्णपणे तोडले होते. त्याचा राग शेख याच्या मनात होता. सोमवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तरुणी कामावरून घरी जात होती.
त्यावेळी शेख याने तिला किवळे येथील एका मोकळ्या जागेत नेले. तिथे त्याने तरुणीला मारहाण केली. तरुणीला जीवे मारण्याच्या उद्देशाने तरुणीचा गळा दाबून धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर आणि हातावर वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.





