बांगलादेशातील आरोप खोटे, पुरावेच नाहीत; अटक वॉरंटनंतर शेख हसीनांच्या भाचीचा पलटवार

लंडन – बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भाची आणि ब्रिटनच्या संसदेतील लेबर पक्षाच्या खासदार तुलिप सिद्दीक यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले आहेत. बांगलादेशातील भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाकडून हसीना आणि सिद्दीक यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी अटक वॉरंट बजावण्यात आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
तुलिप सिद्दीक या ब्रिटनच्या मंत्रिमंडळात अर्थ मंत्री होत्या. मात्र आपल्या कुटुंबियांच्या नातेसंबंधांमुळे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या सरकारच्या कामात लक्ष केंद्रीत करू शकत नसल्याचे कारण देऊन त्यांनी जानेवारी महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
बांगलादेशातील भ्रष्टाचार विरोधी आयोगाने सिद्दीक यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे आरोप केले आहेत. हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत आणि त्यांच्या वकिलांनी ते हाताळले आहेत, असे त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
एसीसीने सिद्दीक यांच्याशी थेट किंवा वकिलाकरवी संपर्क साधलेला नाही. सिद्दीक यांना ढाका येथे सुरु असलेल्या सुनावणीबाबत काहीही माहिती देखील नाही. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावण्यात आल्याचीही त्यांना माहिती नाही, असेही या निवेदनात म्हटले आहे.
सिद्दीक यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी कधीही बांगलादेशात भूखंड मिळवलेला नाही. तसेच भूखंड मिळवण्यासाठी कोणाकरवी प्रयत्न देखील केलेले नाहीत. यासंदर्भातला कोणताही पुरावा एसीसीने दिलेला नाही. त्यामुळेच हे आरोप पुर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित आहेत, हे स्पष्ट होते, असे सिद्दीक यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.





